पोलिसांसाठी शरद पवारांचं गृहमंत्र्यांना पत्र

Update: 2020-02-13 15:39 GMT

राज्यातील पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण येत असतो. तर नेत्यांच्या जाहीरसभा, मोठे कार्यक्रम यामध्येही पोलिसांना तासनतास उभेच रहावे लागते. पण जिथे कार्यक्रम शांततेत सुरू असतो तिथे बंदोबस्तावरील पोलिसांना बसण्यासाठी खुर्च्याची सोय असावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून तशी मागणी केली आहे.

मिरजमध्ये गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पोलिसांच्या या समस्येचा मुद्दा उपस्थित केला. जाहीर सभा आणि मंत्री, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यांच्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर विशेष ताण असतो. इतरवेळीही पोलीस कर्मचाऱ्यांना तासनतास उभे राहावे लागते. यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही उभे रहावे लागते. सभा किंवा एखादा कार्यक्रम सुरळीत होत असेल तरी पोलिसांना आणि विशेषत: महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्रास सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे अशावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा बसण्याची सोय करावी आणि गृह विभागामार्फत पोलिसांना तशी परवानगी मिळावी अशी मागणी करणारे पत्र आपण गृहमंत्र्यांना पाठवल्याचं त्यांनी सांगितले.

Similar News