मुख्यमंत्र्यांनंतर शरद पवारांना धमकीचा फोन

Update: 2020-09-07 12:40 GMT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) मातोश्रीवर आलेल्या धमकीच्या फोनची चौकशी सुरू झालेली असतानाच आता अजून एका मोठ्या नेत्याला धमकीचा फोन आलेला आहे. हा मोठा नेता म्हणजे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar )आहेत. हा फोन भारताबाहेरून आला होता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यासोबतच शरद पवारांप्रमाणेच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांना देखील अशाच प्रकारे धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे.

कंगणा रनौत (kangana ranaut) प्रकरणी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर त्यावरून ही धमकी आल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांचं काम अधिकच वाढलं असून या धमकी प्रकरणाभोवतीचं गूढ देखील वाढू लागलं आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हे धमकी देणारे फोन आल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीसोबतच वर्षा या शासकीय निवासस्थानी देखील धमकीचा फोन आल्याची माहिती देखील समोर येत आहे. कालच मुख्यमंत्र्यांसोबतच शरद पवारांना देखील धमकीचा फोन सिल्व्हर ओकवर गेला होता. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांना आलेला धमकीचा फोन मात्र देशातूनच आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Similar News