दिग्गज मराठी अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन

Update: 2020-03-17 05:53 GMT

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं वयाच्या 88 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. आज सकाळी पहाटे पुण्यात त्यांचे निधन झाले. मराठी कलासृष्टीला लाभलेले एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. 'आमच्यासारखे आम्हीच', 'गोडी गुलाबी', 'माहेरची साडी', 'बंडलबाज', ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘खरं कधी बोलू नये’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘रंगत संगत’, ‘थरथराट’ 'आयत्या घरात घरोबा', 'झपाटलेला' या सुपरहिट चित्रपटांमध्ये जयराम कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे त्यांचे गाव. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली. पुढे १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी केली.

जयराम यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली होती. जयराम कुलकर्णी यांचे सुपुत्र रुचिर कुलकर्णी हे वकील आहेत. मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव- कुलकर्णी ही जयराम कुलकर्णी यांची सून आहे. पत्नी डॉ. हेमा कुलकर्णी, मुलगा रुचिर आणि सून मृणाल असा परिवार आहे. दुपारी १२ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत जयराम कुलकर्णी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Similar News