स्वच्छतेपुरते मर्यादित ठेऊन गांधीमुल्य संपवण्याचा प्रयत्न - कुमार केतकर

Update: 2019-09-02 05:51 GMT

पुणे : गांधीजींना स्वच्छता अभियानाचा ब्रँड अँबेसिडर करून त्यांचा संपूर्ण जीवनपट आणि त्यांची मूल्य पुसून टाकण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे, असे मत खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी व्यक्त केले आहे. लुई फिशर लिखित आणि वि. रा. जोगळेकर अनुवादित 'महात्मा गांधी जीवन आणि कार्य' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

हिंदू, भारतीय, काँग्रेसी ही गांधींची ओळख फोल आहे, गांधीजी सर्वार्थाने वैश्विक होते आणि त्यांच हे वैश्विकत्व लुई फिशरला कळलं, म्हणून हे पुस्तक प्रसिद्ध झालं, असे केतकर म्हणाले.

लुई फिशरने हे पुस्तक 1951 साली लिहिलं. या पुस्तकाच्या आधारे गांधी नावाचा सिनेमा रिचर्ड अँटनबरोने 20 वर्षे प्रयत्न करून निर्माण केला. त्या सिनेमाला विविध पुरस्कार मिळाले.

पण लुई फिशरने लिहिलेले हे पुस्तक मराठीत यायला इतकी वर्षे लागली. एका 86 वर्षाच्या वृद्धाला हे पुस्तक अनुवादित करावे लागले, अशी खंत केतकर यांनी व्यक्त केली.

गांधीजींबद्दल इंग्लंडमध्ये चरित्र प्रसिद्ध झालं. त्या चरित्रकाराला गांधीजींमध्ये ख्रिश्चन धर्मीय व्यक्ती दिसते. तर आपल्याकडे स्वतःला सनातन हिंदू म्हणवून घेणाऱ्या गांधींचा एक हिंदूच खून करतो, अशी खंत केतकर यांनी व्यक्त केली.

महापुरुष पळविण्याची प्रक्रिया सुरू आहे - नागनाथ कोत्तापल्ले

महापुरुष पळवायचे आणि महापुरुषाचे जे मूळ रूप आहे तेच बदलून टाकायचे अशी प्रक्रिया सध्या समाजात सुरू आहे. याबरोबरच खोटा इतिहास सांगून महापुरुषांमध्ये भांडण निर्माण करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. ज्यांनी नेहरू, सरदार पटेल कधी समजून घेतले नाही ते लोक सरदार हे नेहरूंपेक्षा खूप मोठे होते असे सांगत आहेत, असे मत नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले.

गांधीजींना पुसून टाकणे म्हणजे या देशाच्या इतिहासाला पुसून टाकण्यासारखं आहे. गांधींना कोणीही पळवून नेऊ शकत नाही फक्त आपण गांधी व आपल्यातील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठी साहित्याला अलीकडच्या काळात सर्वात समृद्ध करणारा हा ग्रंथ आहे, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.

Similar News