खलिस्तान समर्थक गटांकडून मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क
मुंबई : खलिस्तान समर्थक गटांकडून मुंबईत दहशतवादी कारवाई करण्याची योजना आखल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळताच गुप्तचर यंत्रणांनी मुंबईत हाय अलर्ट जारी केला आहे. लुधियाना न्यायालयातील बॉम्बस्फोटांशी कथित संबंध असलेल्या शीख फॉर जस्टिस संघटनेचा सदस्य जसविंदर सिंग मुलतानीला ताब्यात घेतल्यानंतर मुंबई आणि इतर मोठ्या शहरांत नियोजित दहशतवादी हल्ल्यांची माहिती मिळाली होती त्यानंतर अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे. खलिस्तान समर्थक गट मुंबई, दिल्ली आणि इतर शहरांमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सच्या संपर्कात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली.
शीख फॉर जस्टिस या संघटनेवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान,दहशतवादी कारवायाची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलीस सतर्क झाले असून संशयास्पद हालचालींकडे लक्ष देत आहे. तर, मुंबई पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला रॅपिड अॅक्शन टीम आणि बॉम्ब शोधक पथक देखील सतर्क असून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत.