जिल्हाधिकारी कार्यालयात भरवली शाळा...

Update: 2023-02-02 14:58 GMT

यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी विद्यालयामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गणित या विषयाला शिक्षक नसल्याने १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र याचे कुणालाही सोयरसुतक नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेवटी विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपली शाळा भरवली.


यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पार्डी येथील वसंत आदिवासी विद्यालयात गेल्या सहा महिन्यांपासून गणित या विषयाला शिक्षक नसल्याने वर्ग १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यालयातील शैक्षणिक अभ्यासक्रमात ८ विषय असुन ते विषय शिकवण्यासाठी दोनचं शिक्षक शाळेत उपलब्ध आहेत. शिक्षक आणि सोई-सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान इथे होत आहे.

याआधी गणित या विषयाला शिक्षक होते. परंतु मुख्याध्यापकांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन त्यांना शाळेतून बेदखल केले. आणि आतातर मुलींचे विषय मांडण्यासाठी विद्यालयात महिला शिक्षिका सुध्दा उपलब्ध नाहीत. त्यामुळे मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यालयात शौचालय आणि बाथरूम नसल्याने विद्यार्थींनीसह विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आज विद्यालयात सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि आपल्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यासमोर मांडल्या. दरम्यान विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि सोई-सुविधेच्या मागणी घेऊन चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा भरवली होती. 

Tags:    

Similar News