Russia vs Ukraine : युद्धाची शक्यता वाढली, पुतीन यांचा धक्कादायक निर्णय

Update: 2022-02-22 04:45 GMT

संपूर्ण जगाची चिंता वाढवणाऱ्या Russia आणि Urkaine वादात आता युद्धाची शक्यता आणखी वाढली आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन (Putin) यांनी आता आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे अमेरिकेसारखे बलाढ्य राष्ट्र रशियाला इशारा देत असताना रशियाने युक्रेनमधले दोन प्रांतांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देऊन टाकली आहे. युक्रेनचा भाग असलेला डॉनेत्स्क तसेच लुहान्स्क हे दोन प्रांत आहेत, त्यांना रशियाने स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. पुतीन यांनी रशियातील जनतेला उद्देशून एक संदेश प्रसारित केला आहे. त्यामध्ये त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. पुतीन यांच्या या घोषणेमुळे खळबळ उडाली आहे.

रशियाने युक्रेनमधील ज्या दोन प्रांताना स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा दिला आहे त्या लुहान्स आणि डोनेस्क या प्रांतांमध्ये युक्रेनमधील बंडखोरांचे वर्चस्व आहे. या दोन्ही प्रांतांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचा निर्णय़ घेतल्यानंतर पुतीन यांनी यासंदर्भातल्या करारावर सही देखील केली आहे. या निर्णयानंतर रशियाने तातडीने पुढची पावलं उचलत या दोन्ही प्रांतांमध्ये आपले लष्कर तैनात करण्यास सुरूवात केली आहे. युक्रेनमधील या दोन प्रांतांमधील बंडखोरांनी ब्लादिमीर पुतीन यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. याचाच फायदा घेत पुतीन यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे. दरम्यान युक्रेनमधील बंडखोरांना ताकद देण्याचे काम पुतीन यांनीच आधीपासून केल्याचीही चर्चा आहे.

रशियाच्या या धक्कादायक निर्णयानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Volodymyr Zelenskyy यांनी यावर प्रतिक्रिया दिली आङे. युक्रेनला कोणतीही भीती नसून पाश्चिमात्य देश आपल्या पाठिशी उभे राहतील असा दावा देखील त्यांनी केला आहे.

अमेरिकेने रशियाच्या या निर्णयानंतर तातडीने आपली भूमिका जाहीर केली आहे. रशियाने युक्रेनमझील जो भाग स्वतंत्र राष्ट्र म्हणून जाहीर केला आहे, त्या भागातील व्यापार, गुंतवणूक अमेरिकेने लगचेच थांबवण्याचा निर्णय़ घेतला आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी फ्रान्स तसेच जर्मनीच्या राष्ट्र प्रमुखांशी संपर्क साधून पुढील रणनीतीवर चर्चा देखील केली आहे.

दरम्यान नाटोने रशियाच्या या निर्णयाला आक्षेप घेतला आहे. रशियाच्या निर्णयाने युक्रेन या देशाचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला धक्का बसला आहे आणि वादावर शांततेने तोडगा काढण्याच्या प्रयत्नांनाही खीळ बसू शकते, असा इशारा दिला आहे. 

Similar News