नागरिकत्व कायद्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपणार?

Update: 2019-12-31 12:25 GMT

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा देऊन महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन केल्याचा थेट आरोप काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी केलाय. लोकसभेत शिवसेनेनं या विधेयकाच्या बाजूनं मतदान करुन अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबाच दिला आहे, असं नसीम खान यांनी म्हटलंय.

तसंच शिवसेनेने यावर खुलासा करावा अशी मागणीही केली आहे. मोदी सरकारने केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा संविधान विरोधी असून लोकशाहीवरचा हल्ला आहे, आणि अशा विधेयकाला पाठिंबा देण्यापूर्वी शिवसेनेने महाराष्ट्रात मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला विश्वासात घेतलं नाही असंही खान यांनी म्हटलंय.

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने एनडीएमधून बाहेर पडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांबरोबर महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करुन सरकार बनवलेले आहे. सत्ता स्थापन करण्याआधी सर्व मित्रपक्षांनी किमान समान कार्यक्रमही बनवलेला आहे, असे असताना शिवसेनेने घेतलेली ही भूमिका एकतर्फी आणि किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन करणारी असून त्यांनी तातडीने यावर खुलासा केला पाहिजे, अशी मगणी नसीम खान यांनी केली आहे.

खरं तर या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण देत राज्यसभेत विधेयकाला विरोधही केला होता. तसंच राज्यातही हा कायदा लागू करणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे नसीम खान यांनी आताच हा मुद्दा का उपस्थित केलाय असाही सवाल उपस्थित होतोय. शिवसेना यावर आता काय उत्तर देणार ते पाहणं महत्त्वाचं आहे.

Similar News