जबरदस्ती वीजबिल वसूल केल्यास कायदा हातात घेऊ : राजू शेट्टी

Update: 2021-03-19 08:52 GMT

कोल्हापूर : राज्य सरकारने जबरदस्ती वीजबिल वसुली केली तर कायदा हातात घेऊ असा इशारा, राजू शेट्टी यांनी दिला आहे. एकीकडे वाढीव वीज बिलांच्या वसुलीवरुन राज्यातील जनतेमध्ये संताप असताना आता महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता वीजबिल वसुलीविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे. लॉकडॉऊनच्या काळातील सर्वसामान्य ग्राहकांचे वीजबिल माफ करावे या मागणीसाठी कोल्हापूर जवळच्या पंचगंगा पूलावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकरत्यांनी आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी पुणे- बेंगलोर महामार्ग रोखला होता. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या रास्तारोको दरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती.

स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि वीज अभ्यासक प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सरकारने दिलेलं आश्वासन पाळावे असे आंदोलकांचे म्हणणे होते. भाजप वगळता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा या आंदोलनात सहभाग होता. सर्वसामान्य वीजग्राहकांना दिलासा द्या आणि वीज बिल माफ करेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. जबरदस्ती वीज बिल वसूल कराल तर आम्ही कायदा हातात घेवू,असं खुलं आवाहनही राजू शेट्टी यांनी यावेळी राज्य सरकारला दिले.

Tags:    

Similar News