Raja Dhale : चळवळीतील सकारात्मक धाक पडद्याआड

Update: 2019-07-16 18:04 GMT

राजाभाऊ ढाले हे आंबेडकरी चळवळीचे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांच्यासमोर तोंड उघडण्यास भलेभले घाबरत असत. माझा आणि राजाभाऊ ढाले यांचा संपर्क एक कार्यकर्ता, पत्रकार असा होता. धम्मलिपी च्या वर्धापन सोहळ्यात कविता वाचन, जमेल ती मदत करणे आणि राजाभाऊ ढाले यांना पाहत राहणे. मग ते लाकडी खुर्ची आणि टेबल समोर बसलेले, घरात सगळीकडे पुस्तकच पुस्तक . कधी कधी तर फरशीवर बसून धम्मलिपीच्या अंकाचे पत्ते चिकटवताना राजाभाऊंना पाहिले आहे. त्यांच्या प्रत्येक कामातून अतिशय नीट नेटके पणा पाहायला मिळायचा.

त्यांच्या त्यानंतर एकदा राजाभाऊ धम्मलिपी च्या अंकासाठी वेगळा असा बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो शोधत होते. त्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो असता त्यांनी हा विषय काढला तर मी त्यांना माझी बहीण सुनंदा सोनावणे-शिरसाट हिच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा घोड्यावर बसलेला फोटो असल्याचे सांगितले. ते ऐकून राजाभाऊ हरखून गेले. त्यांनी तो फोटो आपल्याला धम्मलिपी च्या मुखपृष्ठावर छापण्यास मिळेल का ? असे विचारले. हा संवाद सुरू असताना त्यांनी बाबासाहेब हे खान्देश येथे कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर घोड्यावर बसले होते इतकेच नव्हे तर बाबासाहेब आपल्या पेहरावा बाबत फार चोखंदळ होते, त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्यासाठी घोडा आणणार आहेत असे समजल्यावर त्यांनी खास घोड्यावर बसण्यासाठी तसाच फेटा आणि पेहराव केवळ 2 दिवसात शिवून घेतला होता, असा किस्सा राजाभाऊनी बोलता बोलता सांगून टाकला. मी 2 दिवसांनी बाबासाहेब आंबेडकरांचा घोड्यावरील फोटो नेऊन दिला, नंतर राजाभाऊ तो अतिशय सुंदर रीतीने तो धम्मलिपीच्या अंकावर छापला.

उच्चार, मांडणी किंवा संदर्भ कुठल्याही बाबत त्याना थोड़े देखील प्रदूषण सहन होत नसे.

एक किस्सा आहे, मी त्याकाळात संत कबीर यांचा अभ्यास करत होतो. तेंव्हा माझ्या सोबत माझा मित्र अनिल देखील संगत म्हणून सोबत येत असे. त्याने राजाभाऊ समोर आगाऊ पणा करून कबीर यांचा वर डॉ विजेंद्र स्नातक यांचा उल्लेख डॉ विजेंद्र स्थानक असा केला. बस्स झाले राजाभाऊनी त्याचा अर्धा तास क्लास घेऊन टाकला. त्यानंतर मात्र माझा मित्र मात्र कधीच राजाभाऊ कडे माझ्या सोबत आला नाही.

राजाभाऊ सौंदर्याचे भोक्ते होते आणि हे त्यांच्या अक्षर, पेहराव, केस रचना आणि बोलणे इतकंच नाही तर त्यांच्या साहित्य विचार आणि मांडणीतून देखील दिसून येत असे. 75 ते 80 च्या दशकात अनेक जण राजाभाऊ ढाले यांच्या केश रचनेचे अनुकरण करीत.

जसे मी वर म्हटले आहे की त्यांना कुठल्याच प्रकारचे प्रदूषण सहन होत नसे मग यासाठी ते वेगळा आंबेडकर मांडणाऱ्या ताराचन्द्र खांडेकर असतील, बौद्ध धम्मात नवा देववाद आणून प्रदूषण करणारी धम्मचारी संघरक्षित यांचा संघ असेल किंवा सत्यनारायण गोयंकाजी यांचा विपस्सना साधना परिवार असो, यावर त्यानी जोरदार हल्ला चढ़वला होता. यामुळे त्याकाळात संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.

त्याच पद्धतीने सामाजिक आणि राजकीय चळवळीत राजा ढाले हे मागे पडत गेले कारण राजकीय चळवळीत ज्या फायद्या साठी तडजोडी कराव्या लागतात ते राजाभाऊंना जमणे शक्य नव्हते त्यामुळे त्यांनी नंतर त्याचा नादच त्यांनी सोडून दिला.

आज अल्पशा आजारानंतर राजाभाऊ यांनी आपल्या जीवन यात्रेत पूर्णविराम घेतला आहे. राजाभाऊंनी पूर्ण विराम घेतला मात्र त्यांनी पाहिलेली अनेक स्वप्न आणि संकल्प समाजाने या ज्ञानवन्त, तपस्वी आणि संशोधकाला हवी तशी साथ आणि आधार न दिल्याने तशी राहिली.

नवबौद्ध समाजासाठी त्यांना नवी सामाजिक, कौटुंबीक आणि वैयक्तिक अशी आचार संहिता बनवायची होती. धम्मपदा चे त्यांनी जे भाषांतर केले तसे अनेक धम्म ग्रंथांचे भाषांतर त्यांना करायचे होते. आज शाहू फुले आंबेडकर चलवळीतील एका साकारात्मक धाक राजाभाऊंच्या रूपाने पडद्या आड गेला.

किरण सोनावणे

Similar News