घुसखोरांना हाकलून द्या- राज ठाकरे

Update: 2019-12-21 13:01 GMT

विधानसभा निवडणुक निकालानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज प्रथमच पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा, देशातील अस्थिरता आणि पक्षांचं राजकारण यावर आपलं मत व्यक्त केलं. इथले आहेत त्याची सोय लागत नाही आहे आपण अजुन ओझं घेऊ शकत नाही. सोबतच घुसखोरांनाही देशातुन बाहेर हाकलून द्या अशी ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे...

- येत्या २३ जानेवारी २०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं अधिवेशन मुंबईत पार पडणार.

- देशात सध्या नागरिकत्व विधेयक कायद्यावरुन मोठया प्रमाणात आंदोलन उसळली आहेत. नागरिकत्व कायद्याद्वारे वादंग उभं करून देशातील आर्थिक मंदीवरून संपूर्ण देशाचं लक्ष विचलित करण्याची जी काय खेळी अमित शहांनी खेळली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

- जे काय विधेयकं आणलं जातंय त्यात मुळातच गोंधळ आहे. आधार कार्ड वरून नागरिकत्व सिद्ध होणार नाही, मग आधार कार्ड वरून मतदान कसं होतं? म्हणजे तो माणूस मतदान करू शकतो पण नागरिकत्व सिद्ध करू शकत नाही? मग काय उपयोग त्या आधार कार्ड योजनेचा?

- त्या विधेयकामध्ये असं सांगितलंय की, बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ह्या देशातून मुसलमान सोडून इतर नागरिक भारतात येऊ शकतात, मुळात १३५ कोटी लोकसंख्येच्या देशाला अजून लोकसंख्येची गरज आहे का? जे आताच देशाचे नागरिक आहेत त्यांनाच संसाधनं पुरत नाहीत, सर्व व्यवस्था कोलमडलल्या आहेत.

- इतर कुणालाही देशात घेण्याची गरज नाही पण, परकीय देशातून आलेल्या घुसखोरावांवर कारवाई व्हायलाच हवी. भाजपासह इतर राजकीय पक्षांनी ह्या विषयाचं राजकारण थांबवावं.

- जे पिढयानपिढया असलेले भारतीय मुस्लिम नागरिक आहेत त्यांना असुरक्षित वाटण्याचं कारण नाही. पण मोर्च्यांमध्ये जे वातावरण आहे त्यात भारतीय मुस्लिम किती आहेत आणि बांग्लादेशी, पाकिस्तानी घुसखोर किती आहेत हेही तपासण्याची गरज?

- भारत म्हणजे धर्मशाळा नाही? बांग्लादेशातून-पाकिस्तानातून आलेल्या घुसखोरांना हाकलून दिलेच पाहिजेत.

- प्रत्येक राज्यांमध्ये हे घुसखोर राहत आहेत, तिथल्या पोलिसांनाही हे माहित आहे पण सरकारकडून आदेश नसल्यामुळे पोलिसांचे हात बांधले गेलेले आहेत.

- मुंबईत अनेक ठिकाणी झोपडपट्टी वसवून बांग्लादेशी मुस्लिम राहत आहेत. काही वर्षांनी त्या झोपडपट्ट्या जाळल्या जातात आणि राजकीय आशीर्वादाने पक्की घर बांधून घेतली जातात.

- खरी स्वच्छता मोहीम ही शासकीय यंत्रणांमध्ये व्हायला हवी. जर चिरीमिरीसाठी दाखले, शिधापत्रिका बनवून दिल्या गेल्या नसत्या तर ह्या घुसखोरांना आश्रयच मिळाला नसता.

- महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी मुस्लिम पट्ट्यात कधी दंगली होत नाहीत कारण त्यांचं कुंटुंब, कामधंदा तिथे असतो त्यामुळे ते असल्या नसत्या उठाठेवी करत नाहीत. पण जिथे घुसखोर आहेत तिथेच ह्या दंगलीचा स्रोत असतो आणि हे पोलीस यंत्रणेला माहीत आहे. फक्त सरकारने पोलिसांना जर मोकळा हात दिला तर ते निश्चित ह्याची पाळंमुळं उखडून फेकून देतील.

- गेल्या २ महिन्यात जे काही महाराष्ट्रात घडलंय तो महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान आहे.

- या निवडणुकीत जिथे महाराष्ट्र जागा आहे असं दिसलं ते म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर ज्यांनी पक्षांतरं केली होती त्यांचा जनतेने पराभव केला. असा धडा शिकवणं गरजेचं होतं ती अत्यंत चांगली बाब झाली आणि इतकी चांगली गोष्ट घडल्यानंतर सत्तेसाठी राजकीय पक्षांनी महाराष्ट्राशी केलेली प्रतारणा दुर्दैवी.

Similar News