श्रमिक ट्रेनच्या नावाखाली ‘कोरोना ट्रेन’ – ममता बॅनर्जी

Update: 2020-05-30 01:26 GMT

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत मजुरांचे प्रचंड हाल झाले. त्यानंतर लाखो मजुरांनी आपल्या गावाची पायी वाट धरण्यास सुरूवात केल्यानंतर सरकारने त्यांच्यासाठी श्रमिक ट्रेन सुरू केल्या. पण या श्रमिक ट्रेन नसून कोरोना ट्रेन आहेत असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात पोहोचवणाऱ्या ट्रेनमधून कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाहीये तसंच मजुरांना अन्न आणि पाणी पुरवले जात नसल्याचा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

“कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे, पण मग या ट्रेन पूर्ण क्षमेतेने भरुन का पाठवल्या जात आहेत, सोशल डिस्टन्सिंग का पाळले जात नाहीये. श्रमिक ट्रेनच्या नावाखाली भारतीय रेल्वे कोरोना ट्रेन चालवत जात आहे. अतिरिक्त ट्रेन का चालवल्या जात नाहीयेत. मी रेल्वेमंत्री असताना गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला होता. आता ते का केले जात नाहीये? हॉटस्पॉट असलेल्या भागांमधून रेल्वे मोठ्या प्रमाणात लोकांना घेऊन येत आहे.” असे प्रश्न ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये आता सरकारी कार्यालयांमध्ये आता 70 टक्के कर्मचाऱ्यांना येण्यास सांगण्यात आले आहे. तर लॉकडाऊन वाढवले जाणार असले तरी त्यात शिथिलता आणली जाणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर 1 जूनपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळं खुली केली जाणार असून एकावेळ 10 च्यावर लोकांनी तिथे एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Similar News