राहुल गांधींचा कोरोना इशारा आणि मोदींचं उशीराचं शहाणपण !

Update: 2020-03-21 09:34 GMT

"कोरोनाचं (coronavirus) संकट हे गंभीर आहे. त्याने आपले लोक आणि अर्थव्यवस्थेला भयंकर धोका पोहचू शकतो. पण सरकारने अजून म्हणावी तशी दखल घेतलेली नाही. जाग येईल तोवर गुंतागुंत वाढलेली असेल." हे ट्वीट आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं. हे ट्वीट राहुल गांधींनी केलं होतं, १२ फेब्रुवारी, २०२० रोजी. अर्थातच, केंद्र सरकारने त्या ट्वीटची दखल घेतली नाही. प्रधानमंत्री कार्यालयाकडून कोरोनाबाबतचं पहिलं ट्वीट या ट्वीटनंतर महिन्याभराने ४ मार्च, २०२० रोजी आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या (narendra-modi) "जनताकर्फ्यू"ची लोक मोठ्या प्रमाणावर खिल्ली का उडवताहेत, त्याचं कारण प्रधानमंत्र्यांच्या उदासीनता आणि बेजबाबदारपणात दडलेलं आहे.

हाच प्रकार पुलवामा हल्ल्यावेळी झाला होता. देशावरच्या सगळ्यात मोठ्या हल्ल्यावर आधी राहुल गांधींची प्रतिक्रिया आली होती. मोदींना जाग आली होती घटना घडून गेल्यावर तब्बल ३ तासांनंतर ! दिल्लीत नुकत्याच झालेल्या चार दिवस चाललेल्या दंगलीवेळीही मोदींच्या ट्वीटर हॅन्डलवरून हुं की चूं झालेलं नव्हतं. एरवी, अनेक लहानसहान घडामोडींची माहिती मोदींच्या वैयक्तिक ट्वीटर हॅन्डलवरून आणि पीएमओ हॅन्डलवरून दिली जात असते.

१२ फेब्रुवारीला ज्या दिवशी राहुल गांधी कोरोनाबाबत इशारा देत होते, त्याच दिवशी मोदींनी टाईम्सनाऊ संमेलनातील आपली ठळक वक्तव्ये घेऊन वेगवेगळी जवळजवळ १२-१५ ट्वीट केली. राहुल गांधी अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते, म्हणून जागं करतं होते, तेव्हा मोदी देशाला ५ ट्रिलियन डाॅलरचं स्वप्नं दाखवत होते.

१३ फेब्रुवारीला एक रस्ते अपघाताबद्दल व १५ फेब्रुवारीला काशीतील प्रदर्शनाची माहिती देणारं ट्वीट केल्यानंतर मोदींच्या नमामि गंगे वगैरे प्रकल्पासंदर्भातील भाषणाच्या तुकड्यांची वीसेक ट्वीटस् वाचायला मिळतात. पुढे हुनारहाट, लिकी चोखा, उद्धव ठाकरे भेट, ट्रम्प आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांतून देशाबद्दल भरभरून बोलणाऱ्या ट्वीटमधून मोदींची एक अशी दुनिया पाहायला मिळते, जिथे देशातला तळागाळातला माणूस दूरपर्यंत कुठे दिसत नाही. या सगळ्या ट्वीटमध्ये मोदींची स्वत:चीच एक वेगळी दुनिया दिसते.

३१ डिसेंबर, २०१९ रोजी चीनने पहिल्यांदा साथीच्या आजाराची कल्पना जागतिक आरोग्य संघटनेला दिली. तिथून तब्बल तीन महिन्यांनी ४ मार्चला पीएमओ कार्यालयाने कोरोनासंदर्भात पहिलं ट्वीट केलं, तेही पीएमओच्या मुख्य सचिवांनी घेतलेल्या बैठकीचं ! तोवर कोरोनाने भारतात शिरकाव केलेला होता व तो बऱ्यापैकी पसरलेला होता. भारतातली सद्यस्थिती अशी आहे की १२ फेब्रुवारीला राहुल गांधींनी व्यक्त केलेली भीती सार्थ ठरताना दिसतेय. यावेळीही नेहमीप्रमाणेच आपलं अपयश झाकण्यासाठी मोदींनी टाळीथाळी फंडा पुढे केला आहे. नेहमीप्रमाणेच लोकांची दिशाभूल करणाऱ्या संदेशांचा मारा सुरू झालाय. नेहमीप्रमाणेच प्रत्यक्ष उपायांवर बोलण्याऐवजी लोक मोदींचा फंडा देशभक्तीशी जोडून बोलू लागलेत. या दरम्यान मध्यप्रदेशातलं सरकार पाडलं गेलं, कुणाला कळलंही नाही.

 

Similar News