राधाकृष्ण विखे-पाटलांची चौकशी भाजपनं रोखली – अशोक विखे-पाटलांचा गंभीर आरोप

Update: 2019-04-11 01:24 GMT

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याविरोधात काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटायला लागलाय. विखेही काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये फारसे सक्रिय दिसले नाहीत. अशा परिस्थितीतच राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सख्खे मोठे भाऊ अशोक विखे-पाटील यांनीही राधाकृष्ण यांच्यावर गंभीर आरोप करत सत्ताधारी भाजप सरकार राधाकृष्ण विखे यांची एका प्रकरणातील चौकशी थांबवून ठेवल्याचा गंभीर आरोप केलाय. यासंदर्भातली अशोक विखे-पाटलांची एक व्हिडिओ क्लिपच सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे ?

२०१३-२०१४ मध्ये प्रवरा मेडिकल ट्रस्ट संचलित प्रवरा मेडिकल कॉलेजला दहशतवादी जाकिर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च सेंटरकडून २ कोटी रूपयांची देणगी दिली होती. ईडी (सक्तवसुली संचलनालय) ने ज्यावेळी जाकिर नाईकच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या त्यावेळी सापडलेल्या कागदपत्रांमध्ये प्रवरा ट्रस्टला दोन कोटी रूपयांची देणगी दिलेली कागदपत्रं सापडली. त्यानंतर राधाकृष्ण यांचे मोठे भाऊ अशोक यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकऱणाची चौकशी करण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र, भाजप सरकारनं ही चौकशी थांबवून ठेवल्याचा गंभीर आरोपच अशोक विखे-पाटील यांनी केलाय. त्यामुळं राधाकृष्ण विखे-पाटील हे विरोधी पक्षनेते झाल्यापासूनच त्यांचे आणि भाजपचे संबंध अधिक दृढ झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. याप्रकरणी चौकशी का केली नाही, अशी विचारणाही अशोक विखे-पाटील यांनी केलीय.

Similar News