मनसेने शोधलेले बांगलादेशी निघाले युपीचे...!

Update: 2020-02-23 10:07 GMT

मुंबईत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 9 फेब्रुवारीला आयोजित केलेल्या मोर्चात बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशा बाहेर काढण्याची भाषा केली होती. त्यानंतर पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यातील धनकवडी आणि बालाजीनगर परिसरात शोधाशोध करुन तीन संशयित व्यक्तींना पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी धनकवडी पोलिस स्टेशनचे काही कार्यकर्ते देखील उपस्थित होते. मात्र, ताब्यात घेतलेल्या या संशयितांबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे.

मनसेकडून पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आलेल्या या तिघाची सहकारनगर पोलिसांनी सहा तास चौकशी कसून चौकशी केली असता, त्या तिघांकडील कागदपत्रांच्या आधारे ते बांगलादेशी नसून उत्तर प्रदेश आणि कोलकता भागातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या संदर्भात सहकार नगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवाई यांनी माहिती देताना तिघा नागरिकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी संशयित घुसखोर बांगलादेशी म्हणून, घटनास्थळी आमच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर आम्ही त्यांची कसून चौकशी केली असता, ते उत्तर प्रदेश आणि कोलकाता मधील असल्याचे कागदपत्रांच्या आधारे स्पष्ट झाले आहे. ते शहरात काही व्यवसाय करीत आहे. त्या तिघांना आम्ही सोडून दिले दिले आहे. अशी प्रतिक्रिया बिडवाई यांनी माध्यमांनी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरा विरोधात जाहीर केलेल्या पहिल्याच शोध मोहिमेत अपयश आलं आहे.

यावर मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे या मोहिमेबाबत प्रतिक्रिया दिली. काही व्यक्तींना या मोहिमेबाबत समजताच त्या भागातून घर सोडून पळून गेले आहेत. त्या सर्वांची येत्या काळात चौकशी करावी तसंच घुसखोर बांगलादेशी नागरिकांचा तपास मनसेसैनिक करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या तिघा संशयितांना आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिले होते. ते भारतीय असल्याचे स्पष्ट झाल्यानं त्यांना पोलिसांनी सोडून दिलं आहे. अशी माहिती दिली आहे.

Similar News