पुण्यात कोविद-19 संसर्गाविरोधात वस्तीतल्या महिला उतरल्यायंत मैदानात !

Update: 2020-04-12 12:54 GMT

पुण्याच्या वस्त्यांमधील करोना आपत्तीचा सामना करणाऱ्या स्त्रिया स्वत:बरोबर इतर अनेकांची काळजीही घेत आहेत. त्यांना पुरुषांची साथही मिळत आहे. समुदाय-आधारित प्रकल्पातून एकत्रित आलेल्या या स्त्रिया आपल्या वस्तीतल्या लोकांना सुरक्षिततेचा संदेश देत आहेत आणि टाळेबंदीच्या परिणामी भेडसावणाऱ्या प्रश्नांतून मार्ग काढायला, लोकांचे मनोबल वाढवायला मदत करत आहेत. सेंटर फॉर अॅडव्होकसी अँड रिसर्च (सीफार) या संस्थेने वस्ती विकासाच्या कामासाठी तयार केलेल्या समुदाय व्यवस्थापन समितीतील 185 सदस्य, महिला आरोग्य समितीच्या 500 महिला, सहाय्य कक्षातील 125 सदस्य, आणि 10 आशा कार्यकर्त्या मिळून युद्धपातळीवर हे कार्य करत आहेत.

यातल्याच एक आशाताई (नाव बदललं आहे) या विश्रांतवाडीच्या रहिवासी आहेत. बत्तीस वर्षांच्या आशाताई स्वत: ब्रेस्ट कॅन्सरच्या रूग्ण आहेत, तर त्यांचे पती मधुमेह व टीबीचे उपचार घेत आहेत. त्यांना चौदा वर्षाचा एक मुलगा आहे. स्वत:ची व कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आशाताईंनी स्वत:ला सहाय्य कक्षाच्या कामात झोकून दिलेले आहे.

“संसर्ग रोखण्यासाठी जी प्राथमिक काळजी घ्यायची आहे, ती आम्ही लोकांना समजेल अशा प्रकारे समजून सांगतो आहोत. सुरक्षित अंतर राखायचे, हात धुवायचे हे खबरदारीचे मार्ग लोकांना पटवण्यात आम्हाला यश येत आहे.” आशाताई सांगतात.

करोनाच्या आपत्तीमुळे आशाताईंची केमोथेरपी पुढे ढकलावी लागत होती, अशा काळातच सदर अडचणी बाबत स्थानिक नगर सेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्याशी चर्चा केली आणि पुणे महानगर पालिकेच्या शहरी गरीब आरोग्यदायी योजनेच्या मुदत वाढविण्याबाबत विनंती केली. डॉ. सिदार्थ धेंडे यांनी तात्काळ मनपा आयुक्तांशी चर्चा करून योजनेची तारीख ३० जून पर्यंत पुढे वाढविण्यात आली आहे. ज्याचा फायदा अनेक नागरिकांना होईल. घरात जेमतेस जिन्नस आहेत, तशाही परिस्थितीत इतरांना सहाय्य करण्याच्या कामात त्या पुढे आहेत.

आशाताई आजारी असतांना सुद्धा, त्यामुळे विचलित न होता त्यांनी सहाय्य कक्षाच्या कामाला प्राधान्य दिले आहे. “या केंद्राला आम्ही सगळ्या कार्यकर्त्या युद्धपातळीवर काम करून सरकारी उपाययोजनांना पाठबळ देत आहोत. लोकांना संसर्ग होता कामा नये याकरिता आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.” त्या सांगतात.

वस्तीपातळीवरील लोकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत नेण्याचे कामही सीफार करते आहे. हाताला काम नसल्याने लोकांकडे पैसे नाहीत, घरात पुरेसे धान्य नाही, मार्केटमध्ये उपलब्ध धान्य चढ्या दराने विकले जात आहे, या सर्वामुळे नागरिकांची अडचण होत आहे. ती दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला जात आहे. सीफारने सहाय्य सिंगल विंडो या वस्तीपातळीवरील केंद्राच्या मदतीने 312 बांधकाम मजुरांचे सर्वेक्षण केले. काम नसल्याने व हातातील पैसे संपल्याने त्यातील 41% मजुरांची व त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती आजघडीला कठीण झालेली आहे. असंघटित क्षेत्रातल्या बहुतेक कामगारांना आज काम उपलब्ध नाही आणि त्यांच्याकडे पर्यायी आर्थिक आधारही नाही आहे.

सदतीस वर्षांच्या यशवंतनगर वस्तीतल्या मंगल शिरसाट घरकामगार आहेत. त्यांनी म्हटले की टाळेबंदीमुळे कामावर जाता आले नाही. त्यामुळे या महिन्याचा पगार घरमालकिणींकडून मिळणार नाही. श्रमिक वसाहतीतील रीना गवळी याही घरकामगार आहेत, तर त्यांचे पती सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करतात. टाळेबंदीमुळे दोघांचेही काम गेले आहे आणि कमाई बंद झाली आहे.

नागरिकांना दोन महिन्याचे धान्य दिले जाणार असल्याचे अन्न व पुरवठा विभागाने जाहीर केले असले तरीही केवळ अन्नसुरक्षा कायद्याखालील, सरकारी रेशनकार्डधारकांनाच हे धान्य मिळणार आहे. “रेशनकार्ड नसलेल्यांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यांना धान्य मिळले नाही तर उपासमारीला तोंड द्यावे लागेल,” अशी समस्या सीफार संस्थेचे राज्य प्रकल्प व्यवस्थापक आनंद बाखडे यांनी सांगितली.

एकीकडे उपासमारीचे संकट तर दुसरीकडे करोनाचे. तरीही संसर्गाबद्दल लोकांना जागरूक व सतर्क करण्याचे काम सातत्याने चालू आहे, असेही बाखडे यांनी सांगितले. सीफारतर्फे चालू असलेल्या वस्तीपातळीवरील या कामाशी 22,000 कुटुंबे आणि 91,000 नागरिक जोडलेले आहेत.

वस्तीपातळीवरील वास्तव व या समस्यांचे निवेदन सीफारच्या वतीने श्रम मंत्रालय, महिला व बाल विकास विभाग आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाला सादर करण्यात आलेले आहे. नागरिकांना रेशन व वैद्यकीय मदत तातडीने मिळावी अशी मागणी केलेली आहे. सर्वाधिक वंचित नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा समजून घेण्याचे काम सहाय्य कक्षातर्फे चालू आहे आणि सोबतच संकलित माहिती संबंधित सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. पुण्याच्या वस्त्यातील सर्व गरिबांना, रेशन कार्ड असलेल्या व नसलेल्या सर्वांना, धान्य, साबण, वैद्यकीय उपचार मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सीफारने केली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

आनंद बाखडे – 9422961424

प्रमोद गोगावले – 9960696005

Similar News