'दहशतवादाचा भस्मासुर तुमच्यावरही उलटू शकतो'- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Update: 2021-09-26 03:07 GMT

न्यु यॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या 76 व्या आमसभेत शनिवारी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादासह चीनवर नाव न घेता टीका केली आहे, ते म्हणाले की समुद्र हा आपला मोठा वारसा आहे. जागतिक व्यापारासाठी समुद्रमार्ग हे अतिशय महत्त्वाचे आहेत. विस्तारवादी भूमिका घेणाऱ्यांपासून जगाने स्वत:चे रक्षण केले पाहिजे. जागतिक कायदे, मूल्ये, नियमांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे. 

सोबतच यावेळी बोलताना ते म्हणाले की अफगाणिस्तानचा वापर दहशतवाद व घातपाती कारवायांसाठी होणार नाही याची जगाने दक्षता घेतली पाहिजे. दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, हा भस्मासुर तुमच्यावरही उलटू शकतो, असा खणखणीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दिला.

दरम्यान भारताने जगात सर्वात आधी डीएनए लस विकसित केली. ही लस १२ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला दिली जाऊ शकते असं मोदी म्हणाले.

सोबतच कोरोनाशी मुकाबला करण्याकरिता भारत आरएनए पद्धतीची, तसेच नाकावाटे घेता येणारी लस तयार करण्यात व्यस्त आहे. जगातील सर्व लस कंपन्यांनी भारतात उत्पादनांची निर्मिती इथे सुरू करावी, असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले.

Tags:    

Similar News