मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांच्याविरोधातील तक्रारीची चौकशी होणार- गृहमंत्री
मुख्यमंत्री आणि संजय राऊत यांच्याविरोधातील तक्रारीची चौकशी होईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले होते. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली. पण नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये हनुमान चालीसाच्या नावाने दंगा करण्यात आला त्यामुळे पोलिसांनी अटकेची कारवाई केली, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आह. तसेच किरीट सोमय्या यांच्याबाबतीत काल रात्री जी घटना घडली आहे त्या संदर्भात देखील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. तसेच ही घटना दुर्दैवी असली तरी सर्वांनी समजूतदारपणा दाखवून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पण पोलिसांनी आदेश देईल सुडाची कारवाई केली जात असल्याचा आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळला आहे. पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही त्यांना त्यांचं काम माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राष्ट्रपती राजवटीच्या चर्चेबद्दल त्यांना विचारले असता अशी मागणी कोणी केली असे काही दिसत नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितले. किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक झाली हे खरे असले तरी कोणाकडून झाली कोणी आणि कोणी केली याचा तपास सुरू आहे यासंदर्भात गुन्हा देखील दाखल झाला आहे, पोलिस यासंदर्भात योग्य ती कारवाई करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.