उत्तर महाराष्ट्रात पोलिसांची मोठी कारवाई ; तब्बल ४ कोटी २८ लाखांचा गांजा केला जप्त

Update: 2021-10-30 13:36 GMT

अहमदनगर : उत्तर महाराष्ट्रात पोलिसांनी मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल ४ कोटी २८ लाख रुपयांचा ५ हजारहून अधिक किलो गांजा जप्त केला आहे. याशिवाय ७ लाख रुपये किमतीच्या आसपास ब्राउन शुगर तसेच सुमारे २ लाख रुपयांचा चरसही पोलिसांनी जप्त केला आहे. गेल्या वर्षभरात या कारवाया करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

मागील वर्षभरात पोलिसांनी उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये छापेमारी करत केलेल्या कारवायामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "नाशिक विभागातील अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक ग्रामीण या ५ जिल्ह्यांमध्ये गेल्या दीड महिन्यात विशेष मोहिम राबवण्यात आली. यात २२ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत एकूण ३८ आरोपींचा समावेश असून तब्बल ४ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात चरस, ब्राऊन शुगर, गांजासह चारचाकी, दुचाकी वाहनांचा समावेश आहे."

सोबतच पोलिसांनी अवैध शस्त्रांस्त्रांवर देखील मोठी कारवाईत करत एकूण ३६ पिस्तुल जप्त केले आहेत. या प्रकरणांमध्ये ४८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या शस्त्रांचा मुख्य पुरवठादार असलेला आरोपी सतनाम सिंग याला देखील अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags:    

Similar News