वालधुनी नदीत बुडणाऱ्या युवकाला पोलिसांनी दिले जीवदान

कल्याण- डोंबिवली शहरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने वालधुनी नदी ओसांडून वाहत आहे. दरम्यान वालधुनी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणाऱ्या मद्यधुंद तरुणाला पोलिसांनी बाहेर काढत जीवदान दिल्याची घटना समोर आली आहे.

Update: 2021-07-23 12:40 GMT

डोंबिवली शहरालगतच्या नद्यांना आलेल्या पुरामुळे शहरात निर्माण झालेली पूरस्थिती ओसरली असली तरी अद्यापही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आज दुपारच्या सुमारास वालधुनी नदीत पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बाहेर काढत जीवदान दिले आहे. हि संपुर्ण घटना प्रत्यक्षदर्शीनी मोबाईल कॅमेरात कैद केली आहे.

सलमान अन्सारी असं या युवकाचे नाव असून हा युवक नशेत असल्याने तो पालिकेच्या गणेश घाट डेपोच्या मागील बाजूने नदीत उतरला. मात्र, नदीच्या प्रवाहाबरोबर तो वाहून जाऊ लागला. दरम्यान सलमान शहाड येथील पुलाजवळ असलेल्या खांबाला अडकला. एक तरुण पाण्यात बुडत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोरीच्या साहाय्याने सलमानला पाण्यातून बाहेर काढले. आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलीस आणि नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळेच सलमानचे प्राण वाचलेत.

राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असल्याने अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सुचना दिल्या जात असतांना देखील नागरिक पाण्याच्या ठिकाणी बेजाबदारपणाने वागत असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन संबधित प्रशासनाकडून केले जात आहे.

Tags:    

Similar News