कोरेगाव भीमा प्रकरणी पोलिसांचीच चौकशी व्हायला हवी – शरद पवार

Update: 2020-02-18 06:41 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईमध्ये कोरेगाव-भीमा प्रकरणावर पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणात पोलिसांनी अधिकांचा गैरवापर केला असून पोलिसांच्याच चौकशीची मागणी केली. यासोबतच संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांनी कोरेगाव-भीमामध्ये वेगळं वातावरण तयार केल्याचा दावाही केला.

कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या आधी पुण्यात एल्गार परिषद झाली होती. या परिषदेला १०० हून अधिक संघटना सहभागी होत्या. या परिषदेचा आणि कोरेगाव-भीमा प्रकरणाचा कसलाच संबंध नाही. मात्र तरीही परिषदेशी संबंध नसलेल्यांवर खटले भरले गेल्याचा आरोप पवार यांनी केला.

अनेक वर्षांपासून लोक कोरेगाव-भीमा इथं अभिवादन करण्यासाठी जातात. स्थानिक रहीवाशी आणि बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये कधीच कटूता नव्हती. मात्र, संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांनी कोरेगाव-भीमामध्ये वेगळं वातावरण तयार केल्याचा आरोपही पवार यांनी केला.

या प्रकरणात खटला भरण्यात आलेल्या सुधीर ढवळे यांनी एल्गार परिषदेत उपेक्षितांवरील कवितेचे वाचन केले. यातून त्यांनी लोकांच्या तीव्र भावना मांडण्याचा प्रयत्न केला होता. ही कविता नामदेव ढसाळ यांची होती. केवळ ही कविता वाचल्यानं ढवळे यांच्यावर खटला भरण्यात आल्याचं पवार यांनी सांगितलं.

या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात यावी या मागणीच्या त्यांनी पुनरुच्चार करत पोलिसांच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली. याची सखोल चौकशी झाली तर लागेबांधे बाहेर येतील आणि तुरूंगात असलेल्या लोकांची सत्यता बाहेर येईल असं पवार म्हणाले.

NIA च्या तपासासोबत राज्य सरकारला समांतर चौकशी करण्याचा अधिकार असल्याचंही पवार यांनी सांगितलं.

Similar News