पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक

Update: 2021-12-12 03:18 GMT

नवी दिल्ली  : देशात आधीच क्रिप्टो करन्सीवर गोंधळाची स्थिती असतानाच, आणि सरकारने अशा करन्सीला मान्यता नकारली असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं आहे. मध्यरात्रीनंतर हॅकर्सनी हा प्रताप केला आहे. मोदींच्या हॅक झालेल्या अकाऊंटवर बिटकॉईनच्या संदर्भात ट्विट केलं गेलं आहे. त्या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे. कारण हे ट्विट सरकारनं बिटकॉईन्सच्या संदर्भात जो निर्णय घेतला त्याच्या एकदम उलटं आहे. मात्र, आता पंतप्रधान मोदी यांचं हे ट्विटर हँडल पुन्हा सुरक्षित केलं गेलंय.


 


आज पहाटेच्या सुमारास म्हणजेच 2 वाजून 11 मिनिटांनी पंतप्रधान मोदी यांचं ट्विटर हँडल हॅक करण्यात आलं होतं. हॅकर्सनी त्याचा वापर बिटकॉईनच्या संदर्भात घोषणा करण्यासाठी केला. 'भारतानं रितसर बिटक्वाईन कायद्याला मंजुरी दिली आहे आणि सरकार 500 BTC खरेदी करुन लोकांना वाटत आहे' असं हॅकर्सनी ट्विट केलं. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. मात्र, हॅकर्सचा हा गोंधळ फार काळ चालला नाही. दोन मिनिटानंतर हे ट्विट डिलिट करण्यात आलं. नंतर पुन्हा 2 वाजून 14 मिनिटांनी ट्विट केलं गेलं. ज्यात पुन्हा आधीचाच मजकूर होता. त्यानंतर पुन्हा हे बेकायदेशीर ट्विटही डिलिट केलं गेलं. मात्र, तोपर्यंत अनेकांनी या ट्विटचे स्क्रिनशॉट घेऊन व्हायरल केले. बिटकॉईन्स हा ज्वलंत प्रश्न आहे आणि एवढ्या मोठ्या निर्णयाचे स्क्रिनशॉट व्हायरल होणारच होते. मात्र, पुन्हा एकदा पंतप्रधानांचं ट्विटर हँडल सुरक्षित नसेल तर सामान्यांचं काय असा प्रश्न चर्चेत आला आहे.

मात्र, या सर्व गोंधळात भारत सरकारनं कुठल्याच क्रिप्टो चलनाला मान्यता दिलेली नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियानं त्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. कारण क्रिप्टो करन्सीला मान्यता दिली तर सरकारच्या अस्तित्वावर, त्याच्या चलनावरच संकट येऊ शकतं असं जाणकारांना वाटतं. यासंदर्भातलं विधेयक लवकरच येण्याची शक्यता आहे.

Full View

Tags:    

Similar News