वरळीची आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्राची योजना कोणाचे चोचले पुरविण्यासाठी?

Update: 2020-03-12 16:17 GMT

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे गोलमाल, दिशाहीन आणि सामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसणारा आहे. एका बाजूला बुलेट ट्रेनला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजुला वरळी येथे ‘लंडन आय’च्या धर्तीवर कोट्यवधी रुपयांचे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र उभारण्याची घोषणा करायची, यामधून नेमके कोणाचे चोचले पुरविलेल जात आहेत असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केलाय.

राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सुमारे २ तास केलेल्या भाषणात अर्थसंकल्पातील त्रुटींवर टिकेची झोड उठविली. राज्यपालांचे अभिभाषण राज्याची आगामी दिशा दर्शविणारी असतो, परंतू अर्थसंकल्पामध्ये मात्र राज्यपालांच्या अभिभाषणाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे असं दरेकर म्हणाले.

अर्थसंकल्पात वीज दरवाढीची तरतूद करुन सामान्य ग्राहकांवर भुर्दंड पडणार आहे. शेतकऱ्यांसाठीच्या प्रोत्साहीत योजनांसाठी भरीव तरतूद नाहीत. ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरुन प्रतिसाद दिला, त्या कोकणासाठी मात्र अर्थसंकल्पात भरीव तरतूद नाही. कोकणातील मच्छिमारही या अर्थसंकल्पात उपेक्षित राहिला आहे. राज्यातील साखर कारखान्यांना या अर्थसंकल्पामधून कोणतीही उभारी मिळालेली नाही. औदयोगिक क्षेत्र असो वा आदिवासी विकास या विभागासाठी कोणतीही नवीन योजना महाविकास आघाडी सरकारने दिलेली नाही असा आरोप प्रविण दरेकर यांनी केलाय.

पर्यटन खात्याकडे तसेच महाविकासअघाडी सराकार मधील काही मोजक्या मंत्र्यांच्या विभागावर अर्थसंकल्पात विशेष मेहेर नजर दाखविण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्थसंकल्प बनविताना महाराष्ट्राच्या कोट्यावधी जनतेच्या हिताकरिता अर्थसंकल्पात तरतूद न करता केवळ काही व्यक्ती आणि खात्यांना विशेष महत्व देण्यात आल्याचा आरोप करताना दरेकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासासाठी आमच्या सरकारने प्रस्तावित केलेल्या बुलेट ट्रेन ला एका बाजूला विरोध करायचा आणि वरळी मधील मोक्याच्या ठिकाणचा कोट्यावधी रुपयाचा भूखंड आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्रासाठी देऊन तेथे मुंबई आय तयार करण्यासाठी घ्यायचा हा सरकारचा डाव आहे. केवळ मोक्याचा भूखंड हडप करुन खाजगी विकासाला आंदण देवून मुंबई आय चा प्रकल्प राबविण्याचा या सरकारचे धोरण आहे, कोणाचे तरी चोचले पुरविण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप ही दरेकर यांनी केला.

Similar News