वीजबिल भरून सहकार्य करा ,ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे आवाहन

Update: 2022-03-13 12:48 GMT

 महावितरणला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले. जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे रविवारी महावितरणच्या 33 केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री ना.श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ऊर्जामंत्री ना.डॉ.राऊत दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. ते म्हणाले की, मागील दोन वर्षाच्या कालखंडात ऊर्जा विभागाने विशेषत: कोविड काळात जळगाव जिल्ह्यात उल्लेखनीय कामे केलेली आहेत. त्यामध्ये उच्चदाब वितरण प्रणाली आणि इतर योजनेत 33 केव्ही क्षमतेची नवीन 6 उपकेंद्रे उभारली आहेत. त्यामध्ये बोरगाव, भेटा (तालखेडा), जामनेर, रावेर, अमळनेर, वाडे (भडगाव) यांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुमारे 63 हजार 348 कृषी वीज जोडण्या दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत सुमारे 320 वीज जोडण्या देऊन गरिबांचे घर प्रकाशमान करण्यात हातभार लावला.

कृषी धोरण 2020 अंतर्गत जिल्ह्यात 2 लाख 8 हजार 507 ग्राहक संख्या असून निर्लेखनाद्वारे मिळालेली सूट 793 कोटी इतकी आहे तर माफ होणारी 50 टक्के रक्कम सुमारे 1095 कोटी आहे. शेतकरी बांधवांनी कृषी धोरणाचा लाभ घ्यावा.यातून जिल्ह्यास सुमारे 116 कोटी रुपयांचा आकस्मिक निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून आपल्या भागातील विद्युत वाहिन्या आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. आरडीएसएस योजनेत 33 केव्ही क्षमतेची 27 उपकेंद्रे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये कुसुंबा, कजोंद, वडगाव, शिरसमनी, शेलावे, खेडगाव नंदीचे, एस-सेक्टर, एफ-सेक्टर, जळगाव खूर्द, खेडी बुद्रुक, शनिपेठ, एच-सेक्टर, डी-सेक्टर, वरगव्हाण, भानवाडी, नागलवाडी, ताडे, खडके, भोणे, टाकरखेडा, उनपदेव, मारवड, हतनूर, कहुर खेडा, सुनगाव, पहुर आणि पाळधी गावांचा समावेश आहे.

ज्यांची कायम वीज तोडण्यात आली आहे, त्यांच्यासाठी विलासराव देशमुख अभय योजना 1 मार्चपासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही डॉ.राऊत यांनी केले.वीज क्षेत्र हे अतिशय संवेदनशील असे क्षेत्र बनले आहे. विजेशिवाय राहणे असह्य होत आहे. कोविड काळात आपल्या जिवाची पर्वा न करता वीज योद्ध्यांनी राज्यभर अखंडित वीजपुरवठा ठेवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. अनेक वीज योद्ध्यांनी आपल्या प्राणाची आहुतीदेखील दिली आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे, असे डॉ.राऊत म्हणाले.

ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले की, वीज उत्पादनासाठी कोळसा, तेल खरेदी करण्यासाठी पैशाची गरज असते. जर वीजबिल वसुलीच झाली नाही, तर कसे होईल? आज मोठ्या प्रमाणावर थकबाकीचा डोंगर उभा झाला आहे. त्यामुळे ऊर्जामंत्री म्हणून मला कृपया समजून घ्या. शेतकऱ्यांचे दु:ख मला माहीत आहे. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांप्रत कटिबद्ध आहे. वीजग्राहकांच्या बिलाबाबत तक्रारी दूर करण्यासाठी मी राज्यभर वीजबिल दुरुस्ती व तक्रार मेळावे घेण्याचे महावितरणला निर्देश दिले आहेत, त्यानुसार मेळावे सुरू झाले आहेत. संवादातून मार्ग निघतो, यावर माझा विश्वास आहे. महावितरणला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही संवाद वाढवतोय. त्यासाठी ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, अशी अपेक्षा डॉ.राऊत यांनी व्यक्त केली.

यावेळी पालकमंत्री ना.श्री.गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्ह्यात कृषी आकस्मिक निधीतून विद्युत विकासाची कामे करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी भरलेल्या वीजबिलाची रक्कम जसजशी वाढत जाईल, त्या प्रमाणात कृषी आकस्मिक निधीत भर पडणार आहे. त्यातून विकासकामे करून शेतकऱ्यांच्या विद्युत समस्या मार्गी लागतील. त्यामुळे वीजबिल भरून शेतकऱ्यांनी महावितरणला साथ द्यावी. कृषी आकस्मिक निधीतून होणाऱ्या चिंचोली येथील उपकेंद्राचा लाभ तालुक्यातील साडेचार हजार ग्राहकांना होणार आहे. त्यांना सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा होईल, असे ना.पाटील म्हणाले.

या कार्यक्रमास महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. कैलास हुमणे, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री. फारूक शेख, जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. रमेशकुमार पवार, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्ही.बी.पाटील, उपकार्यकारी अभियंता एस.के.पाटील, पं. स.सदस्य नंदू पाटील, रावसाहेब पाटील, कैलास चौधरी, राजेंद्र चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:    

Similar News