"इकडे काही जोतिरादित्य होणार नाहीत, तुम्ही तुमचं पाहा!"

Update: 2020-03-13 10:58 GMT

अर्थसंकल्पीय अधिवेशादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत जोरदार फटकेबाजी केली. अर्थसंकल्पात विदर्भ-मराठवाड्यावर अन्याय झाला या विरोधकांच्या आरोपावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भ-मराठवाड्यासाठीच्या तरतुदी वाचून दाखवल्या.

त्यांच्या भाषणादरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरं देतांना दादांची गाडी चांगलीच सुसाट सुटली होती.

सुधीर मुनगंटीवार यांच्या ‘आमची चूक झाली’ या वक्तव्यावरही अजितदादांनी जोरदार टोलेबाजी केली. “परत कधी संधी मिळाली तर असं वागू नका. काट्याने काटा काढला जातो. चार दिवस सासूचे असले तरी चार दिवस सुनेचेही येतात. आता चुकीला माफी मिळणार नाही”, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून त्याबद्दलची खात्री करून घेतली.

“उद्धव यांच्या उजव्या कानाला मी असतो आणि डाव्या कानाला बाळासाहेब (थोरात) असतात. आम्ही त्यांना सारखं विचारत असतो, माफी नाही ना?” असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकल्या. यावेळी विरोधी बाकांवर बसलेल्या चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनाही हसू आवरत नव्हतं.

यानंतर, “माझं म्हणणं असं आहे” असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर दादांनी पुन्हा मुनगंटीवारांना टोला हाणला.

“माझं म्हणणं असं आहे” हे म्हणतच मागे बसलेले आमदार सांभाळावे लागणारंयत. नाहीतर ते सगळे इकडे तिकडे जातील. आमच्याकडे काही ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही. तुमच्यातलेच काही सदस्य गैरहजर आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवा”, असं म्हणत अजितदादांनी मुनगंटीवारांना पुन्हा टोला लगावला.

“मी जे काही केलं ते समोर करतो. लपून करत नाही. तुमच्याकडे आलो, तिथे सरकार स्थापन केलं. नंतर ते सोडून इकडे आलो आणि आता इथंही मजबूत बसलो आहे”, हे सांगायला दादा विसरले नाही.

Similar News