Aryan Khan विरोधात कोणताही पुरावा नाही, हायकोर्टाचा NCBला दणका

Update: 2021-11-20 12:12 GMT

क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला हायकोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर आता कोर्टाच्या आदेशाची सविस्तर प्रत उपलब्ध जाली आहे. NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आर्यन खानला अटक केली होती. तसेच आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी ड्रग्ज तस्करीचा कट रचला होता, असा दावा कोर्टात कऱण्यात आला होता. पण आता NCBला हायकोर्टाने दणका दिला आहे. यानुसार आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनी ड्रग्ज तस्करी संदर्भात काही कट रचल्याचा एकही पुरावा नसल्याचे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

१४ पानांच्या या आदेशात हायकोर्टाचे न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आर्यन खान आणि इतर दोन आरोपींविरोधात NDPS कायद्यांतर्गत ड्रग्ज तस्करीचा कट रचल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असे स्पष्ट म्हटले आहे. आरोपी केवळ त्या क्रुझवरुन प्रवास करत होते, म्हणून त्यांच्यावर असे आरोप करणे योग्य नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे. तसेच आरोपींनी ड्रग्ज तस्करी केल्याचा एकही पुरावा NCB सादर करु शकलेली नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे. तसेच आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडलेले नाही. त्याचबरोबर अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्याकडे सापडलेल्या ड्रग्जचे प्रमाण NDPS कायद्यानुसार खूपच कमी आहे, असेही मत कोर्टाने नोंदवले आहे.

आर्यन खानच्या वॉट्सअप चॅटमध्येही ड्रग्ज तस्करी करण्यासारखे काहीही आक्षेपार्ह आढळलेले नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. एवढेच नाही तर या तिन्ही आरोपींच्या चॅटमधून त्यांनी एकमेकांसोबत किंवा इतर आरोपींसोबत ड्रग्ज तस्करीचा कट रचल्याचे सिद्ध होत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

२ ऑक्टोबर रोजी NCBने मुंबईहून गोव्याला निघालेल्या क्रुझवर धाड टाकली होती. त्या ठिकाणी ड्रग्ज पार्टी सुरू असल्याचे सांगत NCBने तिथे उपस्थित असलेल्या आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर आर्यन खानला कोर्टाने कोठडी सुनावली होती. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला हायकोर्टाने जामीन मंजूर केला होता.

Tags:    

Similar News