नवदाम्पत्याने जपली सामाजिक बांधिलकी, आहेराच्या पैशांमधून गरिबांना मदत

Update: 2021-07-04 13:14 GMT

कोरोनाच्या संकटात अनेकांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे आले. पण मदत करण्य़ासाठी तुमच्याकडे खूप पैसा असला पाहिजे असे नाही तर फक्त इच्छा शक्ती हवी, हे सिद्ध केले आहे मुंबईतील एका नवविवाहित दाम्पत्याने....प्रभादेवी इथे राहणाऱ्या प्रफुल्ल गावडे या तरुणाचा दोन दिवसांपूर्वी विवाह झाला. पण त्याने सामाजिक भान जपत मित्रांनी केलेल्या आहेराची रक्कम फुटपाथवर राहणाऱ्या 60 कुटुंबांच्या मदतीसाठी वापरली आहे. लग्नाच्या आदल्या दिवशीच त्याने आपल्या मित्रांना लग्नाचा आहेर म्हणून ते देणार असलेले पैसे सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळाला द्यावेत असे आवाहन केले. तसेच स्वत:ची वरात काढण्याचा निर्णय रद्द करत प्रफुल्ल याने तो खर्चसुद्धा मंडळाला दिला. जमा झालेल्या या पैशातुन प्रफुल्ल आणि त्याच्या मित्रांनी धान्य खरेदी केले. लग्नानंतर गावडे दाम्पत्याने स्वत: रस्त्यावर उतरुन वडाळा पश्चिमेला फुटपाथवर राहात असलेल्या 60 गरीब कुटुंबांना धान्यदान केले.


प्रभादेवी इथल्या सौरभ मित्र मंडळाच्या माध्यमातून प्रफुल्ल यांनी ही मदत केली आहे. मंडळाच्या माध्यमातून प्रफुल्ल गेल्या दोन महिन्यांपासून अन्नदानाचे कार्य करत आहे. गरजूंना कमीत कमी 15 दिवस पुरेल एवढे धान्य देण्याचा त्याचा विचार होता. त्यादृष्टीने प्रफुल्ल याने आपल्या विवाहानंतर पहिले कर्तव्य पार पाडले ते अन्नदानाचे....सौरभ मित्र मंडळाच्या या कार्यात अनेकांना धान्याची मदत दिली जात आहे. मंडळातर्फे आतापर्यंत देह विक्री करणाऱ्या महिला ,तृतीयपंथी, फुटपाथवरचे गरीब, रूग्णालयांबाहेर थांबलेले रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्ण यांना मदत केली आहे.

Tags:    

Similar News