ट्रस्टसाठी बदलेले हे नियम तु्म्हाला माहित आहेत का?

Update: 2020-04-09 15:34 GMT

धर्मादाय संस्था किंवा ट्रस्ट यांच्यासंदर्भातल्या आयकर फायनान्स कायदा 2020 मध्ये सरकारने काही महत्वाचे बदल केले आहेत. बऱ्याच चॅरिटेबल संस्था / ट्रस्ट ह्या आयकर कायदा कलम 12 A खाली नोंदल्या जात आहेत आणि ज्यांना 80G अंतर्गत मान्यता आहे, त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे बदल 1 एप्रिल 2020 पासून सरकारने जाहीर केले आहेत. या ट्रस्ट आणि संस्थांना देणगीदारांची माहिती दर तीन महिन्यांनी आयकर खात्याला ऑनलाइन कळवावी लागणार आहे.

तसंच ज्या ट्रस्ट आणि संस्थाना 12 A /80G प्रमाणपत्र आहे, त्यांनी ज्या देणग्या घेतल्या असतील ते आयकर खात्याला दर तीन महिन्यांनी रिटर्नद्वारेही कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ठराविक मुदतीत माहिती न दिल्यास दर दिवसाला 200 रुपये विलंब शुल्क आणि १० हजार रुपये ते एक लाखांपर्यत दंडसुध्दा भरावा लागणार आहे.

जे ट्रस्ट किंवा संस्था 1 एप्रिल 2020 पर्यंत 12 A आणि 80 G अंतर्गत आहेत. त्यांना आपल्या त्यांचे 12 A/ 80 G चे नुतनीकरण करावे लागणार आहे. ह्या सर्व संस्थांना दि. 1 जून 2020 ते 31 ऑगस्ट 2020 पर्यंत नुतनीकरणासाठी आयकर आयुक्त, पुणे यांच्याकडे ऑनलाइन अर्ज करावे लागतील. हा अर्ज केल्यानंतर त्यांना 12 A / 80 G हे 3 महिन्यात द्यावे लागणार आहे.

नवीन बदलानुसार त्या ट्रस्ट किंवा संस्थेने तिला लागू असलेल्या इतर कायद्यांच्या विविध तरतुदींचे पालन केले आहे की नाही? याची सुद्धा आयुक्त खात्री करणार आणि मगच नुतनीकरणाला परवानगी देणार आहेत. ज्या ट्रस्ट किंवा संस्थाना 1 एप्रिल 2020पर्यंत 12 A आणि 80 G आहे, त्यांनी नुतनीकरण केल्यानंतर ते पुढील 5 वर्षासाठीच असेल. याआधीच्या नियमानुसार एकदा याअंतर्गत कायमस्वरुपी नोंदणी केली जात होती.

ज्या ट्रस्ट आणि संस्थांनी 12 A व 80 G साठी अर्ज केले आहेत, पण ते १ एप्रिल २०२०पर्यंत प्रलंबित होते त्या संस्थांचे 12 A आणि 80 G प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन पुढील 3 वर्षांसाठीच असणार आहे. ज्या जुन्या किंवा नवीन ट्रस्ट किंवा संस्था 12A /80G साठी अर्ज करतील त्यांचेदेखील प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन हे 3 वर्षासाठीच असणार आहे.

Similar News