हे राम : “राम भारतीय नाही तर नेपाळी”, नेपाळच्या पंतप्रधानांचं वादग्रस्त वक्तव्य

Update: 2020-07-14 01:58 GMT

भारताशी सीमेवरुन वाद उकरुन काढणाऱे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आता एक वादग्रस्त आणि धक्कादायक वक्तव्य केले आहे.

श्रीराम हे भारतीय नाही तर नेपाळी होते आणि खरी अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये आहे असा दावा ओली यांनी केला आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारतानं चीनवर सांस्कृतिक आक्रमण केल्याचे तारेही त्यांनी तोडले आहेत.

नेपाळमधील बिरगुंजजवळ अयोध्या नावाचे खेडे आहे आणि तीच रामाची जन्मभूमी असल्याचा दावा ओली यांनी केला आहे. वाल्मिक ऋषींचा आश्रमदेखील नेपाळमध्ये आहे आणि इथेच पुत्र प्राप्तीसाठी राजा दशरथाने पूजा केली होती, असेही ओली यांचे म्हणणे आहे.

पूर्वीच्या काळी टेलिफोन किंवा मोबाईलसारखी संवादाची कोणतीही माध्यमं नसताना राम भारतातील अयोध्येतून जनकपूरला सीतेशी लग्न करण्यासाठी कसा काय येऊ शकला असेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

एकंदरीत नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी गेल्या काही दिवसात उघडपणे भारतविरोधी भूमिका घेतलेली आहे. भारताने दावा केलेले भूभाग नेपाळच्या नकाशात दाखवणे, नेपाळमधील कोरोनाच्या संकटाला भारताला जबाबदार धऱणे आणि आता थेट सांस्कृतिक आक्रमणाचा आरोप त्यांनी भारतावर केला आहे.

Similar News