मुंबईत बत्तीगुल,काही काळासाठी लोकल सेवा ठप्प

Update: 2022-02-27 06:14 GMT

Photo courtesy : social media

आज सकाळीच दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईत वीज पुरवठा खंडीत झाला. मुंबईतील काही भागामध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दादर, माटुंगा, भायखळा या भागात वीज पुरवठा खंडित झाल्याचं समोर आलं आहे. यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, टाटा ग्रीडमधील काही तांत्रिक अडचणीमुळे वीज गेल्याची माहिती मिळत आहे.

सायन, माटुंगा, परेल, दादर, सीएसएमटी, भायखळा, चर्चगेट याठिकाणी वीज पुरवठा पूर्ण खंडित झाला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने रस्त्यावर वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे. रस्त्यावर असलेले सिग्नलही बंद आहे.

मुलुंड-ट्ऱॉम्बेवर असलेली MSEB 220 KV ट्रान्समिशन लाइन तुटल्याची माहिती बेस्टकडुन देण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला असल्याचे बेस्टच्या वीज पुरवठा विभागाच्या प्रमुखांनी सांगितले आहे.

वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे पश्चिम मार्गावरील लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाली आहे.चर्चगेट ते अंधेरी मार्गावर लोकल सेवा ठप्प झाली होती.सध्या मुंबई सेंट्रल ते विले पार्ले अशी लोकल सेवा सुरु असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. तर सकाळी ०९.४९ ते ०९:५२ पर्यंत हार्बर आणि मेन लाईनवर वीज पुरवठा काही क्षणासाठी खंडित झाला होता. आता सर्व कॉरिडॉरवर गाड्या धावत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Tags:    

Similar News