मुंबई आणि महाराष्ट्राला दहशतवादी हल्ल्याचा धोका नाही- ATS

Update: 2021-09-15 12:43 GMT

दिल्ली पोलिसांनी ६ संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर घातपाताचा मोठा कट उधळला गेल्याचा दावा केला जातोय. या ६ जणांमध्ये मुंबईतील एका व्यक्तीचा समावेश आहे. जान मोहम्मद शेख असे त्याचे नाव आहे. तो धारावी परिसरात राहतो. हा कट उघड झाल्यानंतर विरोधकांनी ATS झोपली होती का, असा सवाल उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे. पण आता या टीकेला ATSचे अतिरिक्त महासंचालक विनीत अगरवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. जान मोहम्मद शेख हा २० वर्षांपासून दाऊद गँगच्या संपर्कात होता, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

जान मोहम्मद शेख हा आधीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, पाकमध्ये असलेल्या दाऊदच्या गँगसोबत त्याचे संबंध आहेत. पण या प्रकरणाची माहिती ATSकडे नव्हती, दिल्ली पोलिसांना ही माहिती केंद्रीय यंत्रणांनी दिली. तो एकटाच ट्रेनने निघाला असताना त्याला कोटा इथे अटक करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. दरम्यान पाकमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या एकाने मुंबईत रेकी केल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला आहे. त्याच्याकडे कोणतीही स्फोटकं, शस्त्रात्रं मिळाली नाही, तसेच याबाबतची माहिती दिल्ली पोलिसांकडे आहे, दिल्लीत एटीएसचे पथक गेल्यानंतर जान मोहम्मद बद्दल अधिक माहितीची देवाणघेवाण करता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्हाला दहशतवादी हल्ल्याचे अलर्ट येत असतात, पण या प्रकरणाचा विचार केला तर मुंबई आणि महाराष्ट्राला कोणताही धोका नाही, असेही अगरवाल यांनी स्पष्ट केले. दरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार अटक केलेल्या सहा जणांकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहेत, तर या दहशतवाद्यांचा दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात घातपात घडवण्याचा कट होता.

Tags:    

Similar News