#MPSC: परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर, सरकारमध्येही मतभेद

MPSC परीक्षांच्या मुद्द्यावर राज्य सरकारची मोठी कोंडी झाली. एकीकडे विद्यार्थ्यी रस्त्यावर उतरले असताना, सरकारमध्येच यावरुन मतभेद असल्याचे दिसते आहे.

Update: 2021-03-11 12:20 GMT

राज्य सरकार MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता या निर्णयाविरोधात राज्यभरातील MPSCच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरुन उतरून विरोध केला आहे. पुण्यातून या निर्णयाविरोधात आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर राज्यभरात विविध ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. सांगली, औरंगाबाद, अमरावती, नांदेड, बुलडाणा, नाशिक या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. पुण्यातील आंदोलनात भाजपचे नेते गोपीनाथ पडळकर सहभागी झाले आणि त्यांनी निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

दरम्यान मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निर्णयाचे समर्थन करत MPSC परीक्षेबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाला पुन्हा वेगाने वाढत असलेले कोरोना संकट कारणीभूत आहे, असे म्हटले आहे. तसेच राज्यातील भाजप नेत्यांनी या संकटात तेल घालून विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज पसरवू नये, असे आवाहन केले आहे. तसेच एक वेळ उपाशी पोटी राहून, घाम गाळून मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणाऱ्या आई वडिलांचा विचार करून लवकर परीक्षा व्हावी ही सरकारची भूमिका आहे.त्यामुळे विरोधी पक्षाने सामंजस्याची भूमिका घेऊन या संकटावर तोडगा काढण्यासाठी सरकारसोबत चर्चा करावी , आणि संकटात स्वतःचा फायदा आणि संधी बघणे थांबवावे असेही वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान महाविकास आघाडीतच या निर्णयावरुन मतभेद असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी परीक्षा ठरलेल्या वेळेनुसार घ्याव्या अशी मागणी केली आहे, त्यांनी ट्विट करत, यापुढे कोरोनामुळे कोणतीही गोष्ट् न थांबता कोरोनाचे नियम पाळून पुढे जावे लागेल.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अवघ्या तीन दिवसांवर आली असताना अचानक ती पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा. कोविडचे संकट असले तरी कोविड संदर्भातील नियमांची अंमलबजावणी करत एमपीएससीच्या परीक्षा घ्याव्यात अशी मागणी करून आपण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.


Tags:    

Similar News