भाजप आमदारासाठी मनसे रस्त्यावर, पोलिसांचा लाठीमार

Update: 2020-12-04 16:24 GMT

औरंगाबाद - गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे पैसे सभासद शेतकऱ्यांना परत मिळावेत आणि भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी औरंगाबादेत आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची घटना घडली आहे. साखर उपायुक्त कार्यालयावर आंदोलन सुरू असताना आंदोलकांनी जालना रोडवरील क्रांती चौकात रास्तारोको केला. मात्र ट्रॅफिक जाम होत असल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर सुद्धा केला. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा पोलिसांचा मार खावा लागला.

गंगापूर कारखान्याचे चेअरमन आमदार बंब व प्रभारी कार्यकारी संचालक बी एम पाटील यांनी संगनमताने बेकायदेशीररीत्या कारखान्याचे खाते उघडून 15 कोटींची अफरातफर केल्याचा आरोप आहे. त्यानंतर साखर आयुक्त कार्यालयाने कारखान्याचे खाते गोठवले आणि त्यामुळे आर्थिक व्यवहार बंद आहेत. तर शेतकऱ्यांचे पैसे त्यांना मिळत नसल्याचा आरोप करत मनसे कडून शुक्रवारी साखर उपायुक्त कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काही शेतकरी सुद्धा उपस्थित होते.

'मनसे'चे भाजप आमदारांसाठी आंदोलन

भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर कारखान्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे आणि त्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व मनसे नेते संतोष जाधव यांनी केलं. तसेच त्यांनी तसं लेखी निवेदन सुद्धा प्रशासनाला दिले असून, त्यात बंब यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे भाजप आमदारांसाठी ममसेच आंदोलन अशी चर्चा यावेळी पाहायला मिळाली.

आंदोलन सुरू असताना पोलिसांनी केला बळाचा वापर..

आंदोलन सुरू असताना आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी अचानक क्रांती चौकात रास्तारोको केला. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही आंदोलक काही उठण्यास तयार नव्हते. वाहतूक अडवणूक करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी राज्य राखीव दल बोलावून पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक साखर सहसंचालक भेटल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. गोंधळ सुरू झाल्याने काही काळ क्रांती चौकामध्ये गोंधळ उडाला होता.






 


Tags:    

Similar News