#missionbeginagain :10 टक्के उपस्थितीसह आजपासून खासगी कार्यालये सुरू

Update: 2020-06-07 23:47 GMT

मिशनबिगिनअगेन (पुनश्चः प्रारंभ) या अभियानांतर्गत राज्य सरकारने टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात 3 जून, 5 जून आणि 8 जून अशा तीन टप्प्यात केली गेली आहे. आजपासून मिशन बिगिन अगेनचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. आजपासून खासगी कार्यालयांमध्ये १० टक्के कर्मचारी बोलावून काम सुरू करता येणार आहे. इतर कर्मचारी घरी राहून काम करतील. कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर यांचे नियम पाळावे लागतील. घरी परतल्यानंतर घरातील वयस्कर व्यक्तींना कोणताही संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. या अनुषंगाने संबंधित आस्थापनांनी योग्य त्या सूचना/निर्देश सर्व कर्मचाऱ्यांना द्यावे लागतील.

सरकारी ऑफिसमधील उपस्थिती वाढवून बंधनकारक करण्यात आली आहे. पण मुंबईत लोकल वाहतूक बंद आहे, तर बेस्ट सेवा सुरू झाली तरी अर्ध्या प्रवासी क्षमतेने चालणार आहे, त्यामुळे ऑफिसला पोहोचण्याचे आव्हान कर्मचारी आणि अधिकारी यांच्यापुढे असेल.

महाराष्ट्रात धार्मिक स्थळे बंदच

केंद्र सरकारने धार्मिक स्थळे खुली करण्यास परवानगी दिली असली तरी महाराष्ट्रात मात्र कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता धार्मिक स्थळे, हॉटेल्स बंदच राहणार आहेत.

परवानगी असलेल्या कामांसाठी कोणत्याही वेगळ्या सरकारी परवानगीची गरज असणार नाही. स्टेडियम आणि खुली क्रीडा संकुले ही व्यक्तिगत कवायती, व्यायामासाठी वापरात येतील. मात्र या ठिकाणी प्रेक्षक वा दर्शकांच्या सहभागावर पूर्णपणे बंदी राहील. इनडोअर स्टेडियममध्ये कोणत्याही बाबीस परवानगी दिली जाणार नाही. सर्व शारीरिक कवायती आणि व्यायाम सामाजिक अंतराचे नियम पाळून करणे आवश्यक राहील.

सर्व खाजगी आणि सार्वजनिक वाहतुकीचे नियम

दुचाकी एक प्रवासी

तीन चाकी किंवा ऑटो रिक्शा – 1 अधिक 2 प्रवासी

चार चाकी वाहन – 1 अधिक 2 प्रवासी

जिल्ह्यांतर्गत बस वाहतुकीला जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेसह अनुमती असेल. तसेच यामध्ये दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे तसेच स्वच्छताविषयक काळजी घ्यावी लागेल.

आंतरजिल्हा (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) बस वाहतुकीला अनुमती नसेल. यासंदर्भातील आदेश स्वतंत्ररित्या देण्यात येतील.

सर्व दुकाने, मार्केटस् हे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहतील. गर्दी दिसल्यास किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासनाकडून सदरची दुकाने किंवा मार्केट तातडीने बंद करण्यात येतील.

राज्यभर काय बंद राहणार प्रतिबंध :

शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था,विविध शिकवणी वर्ग बंद.

प्रवाशांच्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासास बंदी. (गृह मंत्रालयाच्या परवानगीने जात असलेले प्रवासी सोडून)

मेट्रो रेल्वे सेवा पूर्णपणे बंद.

स्वतंत्र आदेश आणि मानक प्रक्रियेद्वारे (एसओपी) परवानगी न घेतल्यास रेल्वे आणि आंतरदेशीय विमान प्रवासास बंदी.

सिनेमा हॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, मोठे सभागृह, आणि तत्सम इतर ठिकाणे बंद.

सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठ्या समारंभांना बंदी.

सार्वजनिक धार्मिक स्थाने / पुजास्थळे बंद

केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर बंद

शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद

Similar News