मराठा आंदोलन: जालन्यातील अंबड तालुक्यात संचार बंदी लागू

Update: 2024-02-26 07:06 GMT

जालना /अजय गाढे : सगे सोयरे अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर करुन, सगे सोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण चालू आहे. मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी जिल्हयातील विविध भागात आंदोलन, उपोषण चालु आहेत. सगे सोयरे अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर करुन, सगे सोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी २४ तारखेपासून पासून संपूर्ण जालना जिल्हयामध्ये ६० ते ६५ ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी २५ तारखेला अंतवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी घेतलेल्या बैठकीमध्ये पुढील आंदोलन मुंबई येथे करणार असल्याची भूमिका घेतली. काल मुंबईला जाण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. मनोज जरांगे आक्रमक भूमिका घेत मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. दरम्यान अंतरवाली सराटीमध्ये ,मोठ्या संख्येने गर्दी जमण्याची शक्यता असल्याने धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व तालुक्यातील इतर मार्गावर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमून दळणवळण विस्कळीत होण्याची, सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत होऊन गर्दीमुळे सार्वजनिक शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पाहून संपूर्ण अंबड तालुक्यात संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी घेतला आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२)अन्वये अंबड तालुक्याकरीता हे आदेश जारी करण्यात आले असून दि २६ रोजीचे ००.०१ वाजे पासून ते पुढील आदेशापर्यंत संचारबंदी अंबड तालुक्यात लागू करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News