महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तापला, एसटी महामंडळाच्या फेऱ्या रद्द

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमेलगतच्या गावासंदर्भात वक्तव्य केले. त्यामुळे सीमाभागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.

Update: 2022-12-08 08:57 GMT

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavraj Bommoi) यांनी सांगली (sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यातील 42 गावं कर्नाटकमध्ये सामील करण्याविषयी विचार करत असल्याचे म्हटले होते. त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील एकही गाव कर्नाटकमध्ये जाणार नसल्याचे म्हटले होते. त्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य सुरुच ठेवले. त्यामुळे अखेर सीमाभागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे स्थानिक पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार एसटी महामंडळाने कर्नाटकमध्ये जाणाऱ्या दैनंदिन 1156 फेऱ्यांपैकी 382 फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला.

राज्याच्या विविध विभागातून सुटणा-या एसटी बस नांदेड (Nanded), उस्मानाबाद (Osmanabad), लातूर (Latur), सोलापूर (Solapur), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur), सिधुंदुर्ग (Sindhudurg) या जिल्हयातून कर्नाटक राज्यात जातात. यापैकी कोल्हापूर येथून निपाणी-बेळगाव (Nipani-Belgaon) मार्गे जाणाऱ्या सुमारे ५७२ फेऱ्या यापैकी ३१२ फे-या स्थानिक जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या सुचनेनुसार रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गडहिंग्लज, चंदगड, आजरा, तळ कोकण व गोव्याला जाणाऱ्या बस फेऱ्या निपाणी ऐवजी अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. तसेच सांगली जिल्हयातील कर्नाटक राज्यात जाणा-या ६० फे-यापैकी २२ फे-या स्थानिक प्रशासनाच्या सुचनेनुसार रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य विभागातील संवेदनशील मार्गावरील ४८ फे-या रद्द केल्या आहेत.

कोल्हापूर शहरातून क्षेत्र सौंदत्ती येथे सुमारे ७००० भाविकांना घेऊन गेलेल्या १४५ एसटी बसेस मध्यरात्री पर्यत कोल्हापूरात सुखरुप दाखल होतील. या बाबतीत आवश्यकता वाटल्यास कनार्टक पोलीस प्रशासनाने संबधित बसला पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. आज दत्त जयंती निमित्य राज्यातील अनेक तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हयाच्या सीमावर्ती भागात कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे दत्त जंयती निमित्त यात्रा भरविण्यात आली आहे. या यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून सोलापूर-अक्कलकोट-गाणकापूर या मार्गावर जादा वाहतूक केली जात आहे. तेथे कोणतेही विघ्न आलेले नसून यात्रा सुरळीत सुरु आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

Tags:    

Similar News