मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा त्वरीत राजीनामा घ्या : चंद्रकांत पाटील

Update: 2020-04-10 02:46 GMT

लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोक आहेत तिथेच अडकून पडले आहेत, सामान्यांना रस्त्यांवरदेखील फिरता येत नाहीये. पण मंत्रालयातून विशेष परवानगी घेऊन मुंबईतले मोठे उद्योजक असलेले वाधवान आपल्या परिवारासह गुरूवारी महाबळेश्वरमध्ये पोहोचले.

संपूर्ण देशात कोरोनाचा प्रसार थांबण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण देश ठप्प झाला आहे. कोरोनाबाधीत राज्यांच्या यादीत महाराष्ट्र सगळ्यात वर असताना ‘हा’ धक्कादायक प्रकार समोर आला आहे.दरम्यान या प्रकरणावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून असे पत्र देणे हे अशक्य आहे. गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरीत राजीनामा घ्यावा अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पॅरोलवर बाहेर असलेले कोट्यावधींच्या घोटाळ्याचे आरोपी DHFL समुहाचे वाधवान कुटुंबीयांना CBI च्या ताब्यात देण्याऐवजी राष्ट्रवादीकडे असलेल्या महाराष्ट्राच्या गृहखात्यानी त्यांना विशेष सवलत दिली. असा आरोप देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

राज्य एका मोठ्या संकटातून जात असताना हा प्रकार समोर आल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नाराज असल्याची चर्चा आहे.

Similar News