शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर होणार फौजदारी गुन्हे

Update: 2020-06-23 14:47 GMT

सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर आल्यानंतर सरकारने गंभीरतेने याती दखल घेतली आहे.

ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी या प्राप्त होत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे.

ज्या बँक पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचनासुद्धा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Full View

Similar News