लॉयडस मेटल कंपनीच्या उपाध्यक्षाला राष्ट्रवादी आमदाराच्या जावयाकडून बेदम मारहाण

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखाण प्रकल्प सांभाळणाऱ्या लॉयडस मेटल कंपनीच्या उपाध्यक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या जावयाकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

Update: 2022-01-28 04:42 GMT

सुरजागड लोहखाण प्रकल्पातील लोहदगडाच्या वाहतूकीसाठी आणि कामावर कामगार ठेवण्यासाठी आमदारांचे जावई ऋतुराज हलगेकर आणि त्यांचे बंधू जयराज हलगेकर यांच्यात वाद सुरू होता. तर त्यांच्यात सुरू असलेल्या वादातूनच आमदारांचे जावई आणि पाच जणांनी लॉयडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर यांना मारहाण करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखाण प्रकल्पाला नक्षलवादी गटाच्या होणाऱ्या विरोधामुळे हा प्रकल्प कायम चर्चेत असतो. त्यातच सुरजागड लोहखाण प्रकल्प बंद करण्यासाठी एटापल्लीसह परिसरातील ग्रामपंचायती आक्रमक होत आहेत. त्यातच कंपनीच्या उपाध्यक्षाला मारहाण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सुरजागड लोहखाण प्रकल्पातील लॉयडस मेटल कंपनीचे उपाध्यक्ष अतुल खाडिलकर आणि आमदारांचे जावई हलगेकर यांच्यात वाद सुरू होता. तर त्यावरूनच काम बंद पाडण्याच्या धमकीसह शिवीगाळ केली जात होती. मात्र त्यानंतर हा वाद टोकाला गेल्याने आमदारांचे जावई ऋतुराज हलगेकर आणि त्यांचे बंधू जयराज हलगेकर यांच्यासह पाच जणांनी अतुल खाडिलकर यांच्या घरी जाऊन 24 जानेवारी रोजी रात्री मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर आमदार अत्राम यांचे जावई ऋतुराज हलगेकर यांच्यासह पाच जणांवर अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे गडचिरोलीसह एटापल्ली, सुरजागड लोहखाण प्रकल्पात मोठी खळबळ उडाली आहे.

Tags:    

Similar News