लस घेणार नाही म्हणणाऱ्या इंदोरीकर महाराजांचा यू टर्न, म्हणाले

Update: 2021-11-21 04:47 GMT

जालना : कोरोनाची लस घेण्यास नकारात्मकता दाखवणाऱ्या कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनीच अखेर जालन्यातील बदनापूर तालुक्यातून कोरोना लसीकरण जनजागृतीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळालं. त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना लसीकरणाचे आवाहन केलं.

"आपण लस घेतली नाही.! आणि घेणार सुद्धा नाही.! प्रत्येक माणसाची इम्युनिटी पावर ही वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता वेगवेगळी आहे. मी तर लस घेतलेली नाहीये ! आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन तरी काय करणार? कोरोनावर एकच औषध आहे, ते म्हणजे मन खंबीर ठेवा असं इंदोरीकर महाराजांनी म्हटले होते, त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. दरम्यान महाराजांनी इंदोरीकरांच्या हरीपाठाची एक आणि टोपेंच्या दोन कोरोना लस घ्या, असं आवाहन करत कोरोना जनजागृतीला सुरुवात केली.

राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य विभागाकडून वेगवेगळ्या सेलिब्रिटिंच्या मदतीने जनजागृती केली जात आहे. त्यात आता इंदोरीकर महाराजांचा देखील समावेश करण्यात आला आहे. कोरोनाला हरवण्यात पोलीस, डॉक्टर आणि सामाजिक संस्था यांचं मोठं योगदान आहे असंही त्यांनी त्यांच्या किर्तनातून सांगितलं आहे. महाराष्ट्राचा खरा कोरोना योद्धा राजेश टोपे असून जनतेच्या बाबतीत पोलीस आहे असंही ते म्हणाले. दरम्यान, इंदोरीकर महाराज दिवसांतील 4 कीर्तनाच्या माध्यमातून कोरोना लस घेण्यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. इंदोरीकर महाराजांनी कोरोना जनजागृतीला सुरुवात केल्यानं टोपे यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.

Tags:    

Similar News