खर्डा हत्याकांड: बळी दुसरा पण आरोपी तोच...

Update: 2019-11-05 17:16 GMT

नितीन आगेला शाळेतून मारहाण करत वीटभट्टी जवळून नेत असताना ईश्वर पवार पाहत होता. काही वेळाने नितीन ची आई टाहो फोडत तिथं आली. तिने ईश्वर ला नितीन दिसला का विचारले? ईश्वरने त्याचवेळी आरोपींच्या दहशतीमुळे नितीनच्या आईला काहीच सांगितलं नाही. ईश्वर पारधी समाजाचा होता. घरी शिकारीचे जाळे असल्याचे अनेकांना माहीत होते. नितीनचा खून झाल्यावर लटकावून ठेवण्यासाठी त्याच्याकडे जाळे मागण्यासाठी आरोपीतील एकजण आला होता. पण त्याला प्रकार माहीत असल्यानं त्यानं ते दिले नव्हतं.

डोळ्यापुढं घडलेली घटना नितीनच्या आईला ज्यांच्या दहशतीमुळं ईश्र्वर ने सांगितली नव्हती. ती दहशत इतकी मोठी झाली की, चार वर्षातच ईश्वरच्या भावाचा खून रोहित उर्फ बबलू गोलेकर आणि इतर चार आरोपींनी केला. रक्ताचा ओघळ स्वतःच्या घरात जो पर्यंत येत नाही. तो पर्यंत आपल्याला त्याचे काही देणे घेणे नाही. ही मानसिकता का निर्माण होते. असा सवाल या सर्व घटनांचा विचार करता निर्माण होतो.

नितीन आगेच्या केस मधून पूराव्या अभावी सुटलेल्या रोहित गोलेकर त्यावेळी अल्पवयीन होता. आरोपातून सुटल्यावर त्याची गावात दहशत होती. त्याच्यावर हाफ मर्डर गांजा तस्कर तसेच लैंगिक अत्याचाराचे आरोप असल्याचे गावातील लोक सांगतात. प्रकाश सुरवसे याचा हाफ मर्डर केल्याचा आरोप देखील याच्यावर होता. गावात याची दहशत सुरू असताना पोलिसांचे यांच्याकडे दुर्लक्ष कसे झाले? असा प्रश्न पडतो. याला कोणता राजकीय वरदहस्त आहे का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बाजीराव काळे यांचे पैसे बाळू वाळस्कर याच्याकडे होते. असे फिर्यादी वेनुबाई बाजीराव काळे सांगतात. ते मागण्यासाठी २९ ऑक्टोंबर ला घरातील स्त्रिया त्याच्या घरी गेल्या होत्या. बऱ्याच दिवसांनी पैसे देत नाही. म्हणून त्यांनी घरी विचारणा केली. त्यावेळी घरी बाळू वाळस्कर हे नव्हते. म्हणून त्या परत घरी आल्या. पारध्याच्या बायांनी घरात बडबड केली. याचा राग मनात धरून सुधीर बाळू वाळस्कर, आकाश बाळू वाळस्कर योगेश बिभीषण वाळस्कर, रोहित बाबासाहेब गोलेकर, राहुल गौतम तादगे यांनी बाजीराव काळेंचे राहते घर गाठले.

घरी वेणुबाई काळे यांच्यासह इतर सदस्य जेवन करत होते. बाळू पवार हे देखील जेवत होते. घटनेतील आरोपी घरात घुसले व शिवीगाळ करू लागले. महिलांना शिवीगाळ करताना बाळू तुम्ही पैसे देत नाही आणि उलट आम्हाला शिवीगाळ करता? असे बोलला यावर चिडून रोहित गोलेकर याने पहिल्यांदा बाळूला धरून खाली पाडले. व सर्व आरोपींनी लाठा बुक्क्या फराशाचे तुकडे यांनी त्याला बेदम मारहाण केली. यात त्याचा पुढील उपचारासाठी बार्शिला नेतानाच मृत्यू झाला.

या खून प्रकरणातील रोहित उर्फ बबलू गोलेकर हा नितीन आगे खून प्रकरणात देखील आरोपी होता. याबाबत नितीन आगेचे वडील राजू आगे सांगतात. ‘आमच्या नितीनला न्याय मिळाला नाही. त्याला जर न्याय मिळाला असता, तर आज हा खून झाला; नसता. आजही आम्ही दहशतीत जगतोय. सदर आरोपी यांची गावात दहशत आहे. त्यांच्याकडे पैसे असल्यानं ते काही करू शकतात. असा विश्वास त्यांना आहे. याचबरोबर ते पुढे सांगतात की, नितीन आगेच्या चार्चशीट मध्ये हेतूपुर्वक त्रुटी ठेवल्या. त्याचा फायदा आरोपीला झाला. अनेक पंच फुटले. आमच्या पोराच्या बाबतीत जे झाले ते बाळू पवारांच्या केसच्या बाबतीत होऊ नये. पोलिसांनी तपास नीट करावा’ असे ते सांगतात.

या प्रकरणातील आरोपींच्या बाबतीत दुसरी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. पण या प्रकरणाच्या बाबतीत कुणीही बोलायला तयार नाही. मात्र, दबक्या आवाजात जे झाले ते वाईट झालं या लोकांची दहशत मोडीत निघाली नाही. तरी अजुन लोक मारतील. अशा प्रतिक्रिया गावातील विविध दुकानात गेल्यानंतर ऐकायला मिळत आहेत.

या प्रकरणात या भागातील दलित नेते देखील पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यांच्या मनामध्ये देखील विशिष्ट समूहाची भीती असल्याचे दिसून येतं. एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया दिली की, प्रकाश आंबेडकर या ठिकाणी आले तरी प्रकरण अजुन चिघळण्याचे चिन्हं आहे.

याउलट प्रकाश आंबेडकर भेट देणार असल्याची माहिती कळताच येथील मराठा संघटनांनी बैठक घेऊन मोर्चाची तयारी चालविली आहे. झालेला खून हा पारध्याचा झाला आहे. त्यामुळे यात आपण का पडावे? असा सूर देखील येथील नेते आळवताना दिसत आहेत.

एका नेत्याने दिलेली प्रतिक्रिया डोकं सुन्न करून टाकते. आता जे काही घडलंय त्यामुळे मागे जे काही घडून गेलंय ते पुन्हा घडायला नको. ‘बाळू पवार यांच्या दोनही किडन्या फेल झाल्या होत्या. तो दारू पीत होता मारला नसता तरी तो दोन महिन्यांनी मरणारच होता. त्यामुळे आपण या मध्ये पडून मराठा समाजाला का अंगावर घ्यावे'या प्रतिक्रिये मागे एका विशिष्ट समाजाची दहशत असल्याचे दिसून येते. हे वाक्य वरकरणी केवळ स्वजातीय अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा असे दिसत असले तरी यामागे उच्चवर्णीय समाजाचा मोठा दबाव यातून स्पष्ट होतो.

नितीन आगे प्रकरणानंतर मराठा मोर्चे निघाले होते. इतकेच नव्हे तर आरोपी पुराव्या अभावी सुटल्यानंतर गावात जेवण घालून डी जे आणि फटाके वाजवले गेले होते. या गावात ऊसतोडीसाठी आलेल्या लोकांना जेवायला बोलावण्यात आलेले होते. त्यातील एकाने जेवण कशाचे आहे. हे विचारल्यावर त्यांनी सदर बाब सांगितली होती. आपण काही केले तरी पैसे आणि राजकीय वरदहस्त असल्याने सुटू शकतो हा विश्वास त्याला होता का? हे तपासण्यासाठी रोहित गोलेकर याच्या राजकीय संबंधाचा धागा तपासणे महत्वाचे ठरते.

आरोपीला काही राजकीय वरदहस्त आहे का?

या प्रकरणातील आरोपी रोहित उर्फ बबलू गोळेकर याच्या फेसबुक वर राष्ट्रवादीचे मफलर घातलेला फोटो दिसून येतो. विधानसभा निकालानंतर रोहित दादांना ' खर्डा १०३८ Lead Rohit dadana ' अशी पोष्ट रोहित गोलेकरच्या फेसबुक वर दिसून येते. त्यामुळे यांना या पक्षाचा राजकीय वरदहस्त आहे का? अशी चर्चा परिसरात आहे. बाळू पवार यांचा खून झाल्यानंतर आरोपींच्या जवळच्या लोकांनी...

'Only ३०२' असे लिहीत वर्तमान पत्रात आलेली बातमी व्हॉट्सअॅपच्या स्टेटस ला ठेवल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याचा अर्थ ३०२ म्हणजे काहीच नाही. ही मुजोर भावना यांच्या मनात रुजलेली आहे. आरोपी रोहित उर्फ बबलू गोलेकर याच्या गाडीवर 'बकासुर' असे लिहिले आहे. या लिहिण्यामागे आरोपीला लोकांमध्ये कोणता संदेश द्यायचा आहे हा प्रश्न पडतो.

अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. मात्र, या जिल्ह्याच्या हृदयाचे क्षेत्रफळ हे छोटे असल्याचे वारंवार या जिल्ह्याने दाखवून दिलेले आहे. या अगोदर सोनेगाव, सोनई, खर्डा आणि आता पुन्हा एकदा खर्डा ही खूनांची मालिका अशी किती दिवस सुरू राहणार? या सर्व खूनामध्ये मरणारे दलित भटके आणि मारणारे उच्चवर्णीय हेच समीकरण आहे.

अगोदरच रोजगार आणि सोयीसुविधांचा अभाव असलेला जिल्हा आणि त्यात दलित आणि भटक्या समाजावर वारंवार होणार अन्याय ही लोकांची मानसिकता बदलणे हे सरकारपुढील फार मोठे आव्हान आहे. नितीन आगे केसमधील आरोपी सुटण्यामागे पोलिसांनी आरोपीला केलेली मदत आहे. हे नितीनचे वडील वारंवार सांगतात. अशात या केस मधून आरोपींना शिक्षा होईल. हा विश्वास कसा ठेवावा. हे असे झाले नाही तर जात आणि वर्ग वैशिष्ट्यांनी बनलेला समाज आणि त्यातून निर्माण झालेल्या सरकारी यंत्रणा अनेकदा त्यांच्यात लपलेली जात आणि वर्ग यांना वर काढतात. हे सत्य महाराष्ट्राला नवीन असणार नाही.

खर्ड्याच्या या घटनेने मात्र, महाराष्ट्राच्या शिरपेचात लज्जेचा आणखी एक वार्षिक तुरा रोवला गेलाय. दलित अत्याचाराविरोधात काम करणारे वकील विलास लोखंडे यांनी या केसमध्ये खालील मागण्या केलेल्या आहेत.

सर्व साक्षीदारांची साक्ष ऑन व्हिडिओ व्हावी.

लवकरात लवकर चार्जशीट दाखल करून साठ दिवसात निकाल लावावा

मृत बाळू पवार यांच्या मुलांना तात्काळ पेन्शन लागू करून शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी

मृतांच्या वारसदारांना आर्थिक मदत करावी

या प्रकरणात विशेष सरकारी वकील नेमण्यात यावा

पिडीत कुटुंबाचे जामखेड येथे पुनर्वसन करावे.

Full View

Similar News