कायद्याने वागा लोकचळवळीची संविधान हस्ताक्षर स्पर्धा

Update: 2020-01-21 12:15 GMT

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यभर विविध संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेलेले असताना, आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी बहुचर्चित अशा कायद्याने वागा लोकचळवळ आणि बोरूची शाळा यांनी संविधान हस्ताक्षर स्पर्धा घोषित केली आहे. संविधानाची उद्देशिका आपल्या स्वहस्ताक्षरात लिहून काढून त्याची फोटो प्रत किंवा स्कॅन केलेली प्रत राज असरोंडकर यांच्या 98500 44201 या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे पाठवायची आहे.

या स्पर्धेची मुदत 20 जानेवारीपर्यंत होती मात्र आता महाराष्ट्रभरातून आलेला वाढता प्रतिसाद पाहता ती 23 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. स्पर्धेचा निकाल 26 जानेवारी रोजी कायद्याने वागा लोकचळवळीच्या फेसबुक पेजवर घोषित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा शालेय महाविद्यालयीन आणि खुला अशा तीन गटांमध्ये घेण्यात येणार आहे.

कायद्याने वागा लोकचळवळीने संविधान हाच आपला ईझम मानत संविधानिक मूल्यांच्या प्रचार-प्रसारासाठी वेळोवेळी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान सभेतील समारोपाच्या भाषणाच्या भावानुवादाची पुस्तिका कायद्याने वागा लोकचळवळीने नुकतीच प्रकाशित केली आहे. या भाषणाच्या अभिवाचनासाठी चळवळ शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उत्तेजन देत आहे. अभिवाचकांचे चमू तयार करीत आहे. कायद्याने वागा लोकचळवळीच्या सदस्यांनी यापूर्वी महाराष्ट्रात या भाषणाच्या अभिवाचनाचे प्रयोग केले आहेत. युट्युबवरही अभिवाचन उपलब्ध आहे.

आता हस्ताक्षर स्पर्धेच्या माध्यमातून संविधानाची उद्देशिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी. ती वाचली जावी व तोच धागा पकडून लोकांमध्ये भारताचं संविधान जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण व्हावी, वाढावी हा आमच्या स्पर्धेमागचा हेतू असल्याचं कायद्याने वागा लोकचळवळीचे राज्य संघटक राकेश पद्माकर मीना यांनी म्हटलं आहे.

Similar News