Jammu and Kashmir: मध्ये जमावबंदी, मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला नजरकैदेत

Update: 2019-08-05 04:20 GMT

जम्मू-काश्मीर मध्ये वेगानं घडामोडी घडत असून रविवारी मध्यरात्रीपासूनच जमावबंदीसाठी असलेलं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. तसेच माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये फोन, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून शाळा, महाविद्यालयं आणि संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे. सध्या काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या सगळ्या माजी मंत्र्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. काश्मीरमधल्या राजकीय घडामोडींबाबत फारुक अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

नजरकैदेच्या कारवाईवर मेहबुबा मुफ्ती यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. आम्ही शांतीच्या मार्गाने जाणारे नेते आहोत आम्हाला आमच्या घरात नजरकैदेत ठेवलं आहे ही बाब निषेधार्ह आहे अशा आशयाचं ट्विट मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे.

तर ओमर अब्दुल्ला यांनीही या कारवाईचा निषेध करत आमच्या पुढे काय वाढून ठेवलं आहे आम्हाला आाज ठाऊक नाही आम्ही मात्र काश्मीरच्या जनतेला शांततेचं आवाहन करत आहोत या आशयाचं ट्विट केलं आहे.

Similar News