'टर्बनेटर' हरभजन सिंहचा २३ वर्षीय कारकीर्दीला पुर्णविराम

आपल्या वैशिष्ट्येपुर्ण शैलीसाठी प्रसिध्द असलेला भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंहने आपल्या 23 वर्षाच्या क्रिकेटच्या कारकीर्दीला पुर्णविराम दिला

Update: 2021-12-24 15:20 GMT

मुंबई // आपल्या वैशिष्ट्येपुर्ण शैलीसाठी प्रसिध्द असलेला भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंहने (Harbhajan Singh) आपल्या 23 वर्षाच्या क्रिकेटच्या (Cricket) कारकीर्दीला पुर्णविराम दिला. आज ट्वीटरवरून हरभजन सिंहने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत असल्याची घोषणा केली.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघातर्फे खेळताना त्याने इतिहासातील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम केला. त्याने १०३ कसोटी सामन्यात 417 बळी घेतले. तसेच त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 269 बळी घेतले. त्यासोबत त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 28 सामन्यात 25 बळी घेतले. त्यामुळे भारताच्या महान गोलंदाजांमध्ये हरभजन सिंह याची गणना होते. तर या महान गोलंदाजाने आज ट्वीट करून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे म्हटले आहे.

आज हरभजन सिंह याने निवृत्ती जाहीर करताना ट्वीटर संदेशात म्हटले आहे की, सर्व चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतात. आज मी त्या खेळातून निवृत्ती घेत आहे ज्या खेळाने मला जीवनात सर्वकाही दिले. तर मी त्या सर्वांचे आभार मानु इच्छितो. ज्यांनी माझा 23 वर्षाचा प्रवास अविस्मरणीय बनवला. तुमचे खूप खुप आभार.

मार्च 1998 मध्ये हरभजन सिंह यांने वयाच्या 17 व्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. तर त्याच वर्षी एप्रिल 1998 मध्ये न्युझिलंडविरूध्द पहिला एकदिवसीय सामन्याला सुरूवात केली होती.

2007 च्या टी-20 विश्वचषक आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या विजयात हरभजन सिंह याचे महत्वाचे योगदान होते. तर हरभजन सिंह याने कसोटी क्रिकेटमध्ये 2 शतके झळकावली आहेत, अशा प्रकारे 23 वर्षाच्या कालावधीत हरभजन सिंहने आपल्या गोलंदाजीने दिग्गज फलंदाजांची त्रेधातिरपट उडवली. आज हरभजन सिंह याने ट्वीट करून क्रिकेटला अलविदा करत असल्याचे जाहीर केले. तर गेल्या काही दिवसांपुर्वी हरभजन सिंह आणि नवज्योत सिंह सिध्दू यांची भेट झाल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. त्या पार्श्वभुमीवर हरभजन सिंह याने निवृत्ती जाहीर केल्याने तो राजकारणात जाणार असल्याची अटकळ बांधण्यात येत आहे.

Tags:    

Similar News