आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा आणखी एक मोठा विजय

Update: 2020-06-18 02:34 GMT

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून भारताचा पुन्हा एकदा विजय झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यांच्या निवडीसाठी बुधवारी मतदान झाले. यात १९३ सदस्य असलेल्या सभागृहात भारताच्या बाजूने १८४ मतं पडली आणि भारताचा मोठा विजय झाला.

सुरक्षा परिषदेमध्ये ५ कायमस्वरुपी सदस्यांसोबत १५ अस्थायी सदस्य असतात. दर दोन वर्षांनी या अस्थायी सदस्यांच्या निवडीसाठी मतदान घेतले जाते. यात भारतासह २०२१-२२ या वर्षासाठी आयर्लंड, नॉर्वे आणि मेक्सिको यांचीही निवड झाली आहे.

दरम्यान या विजयाबद्दल अमेरिकेने भारताचे अभिनंदन केले आहे. तसेच भविष्यातही दोन्ही देश मिळून जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी एकत्रित काम करत राहतील असे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन आणि रशिया हे देश कायमस्वरुपी सदस्य आहेत. भारतालाही कायमस्वरूपी सदस्य करुन घेण्याची मागणी वारंवार केली जात आहे, पण चीन यामध्ये कायमस्वरुपी सदस्य असलेल्या देशांच्या नकाराधिकाराचा वापर करून भारताच्या मार्गात कायम खोडा घालत आला आहे.

Similar News