जालन्यात सापडलं मोठं घबाड, मोजायला लागले तब्बल तेरा तास

जालन्यात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. यावेळी करण्यात आलेल्या छापेमारीत सापडलेलं घबाड मोजण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना तब्बल तेरा तासांचा काळ लागला. त्यामुळे या कारवाईची राज्यात मोठी चर्चा रंगली आहे.

Update: 2022-08-11 05:51 GMT

जालना जिल्ह्यातील स्टील कारखानदार, कापडाचे व्यापारी, रियल एस्टेटमधील व्यावसायिकांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याची कुणकुण आयकर विभागाला लागली. त्यानंतर आयकर विभागाने 1 ते 8 ऑगस्ट दरम्यान मोठी कारवाई केली. यामध्ये रियल इस्टेट डेव्हलपर , कापड्याचे व्यापारी आणि स्टीलचे कारखानदार यांचे घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली. यामध्ये तब्बल 58 कोटी रुपयांची रोकड, 32 किलो सोन्याचे दागिने, हिरे यांसह 390 कोटी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रं सापडली. तर या कारवाईत सापडलेल्या घबाडाची मोजणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना तब्बल तेरा तास लागल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली.

जालन्यात केलेल्या छापेमारीत 390 कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली. तर जालन्यासह औरंगाबाद येथील एका व्यापाऱ्याचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कागदपत्र ताब्यात घेतले आहेत.

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोख रक्कम आणि इतर ऐवज जप्त केल्यानंतर त्याची मोजणी जालन्यातील स्टेट बँकेत सकाळी 11 वाजता सुरू केली होती. तर ही मोजणी रात्री 1 वाजेपर्यंत सुरू होती. तर या मोजणीसाठी राज्यभरातील आयकर विभागाचे 260 अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. तर ही मोजणी तब्बल तेरा तासानंतर संपल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले.

Tags:    

Similar News