पाकिस्तानला भारताच्या स्नेहा दुबेंनी फटकारले, जगभरात चर्चा

Update: 2021-09-25 10:30 GMT

संयुक्त राष्ट्र संघातील (United Nations) भारताच्या तरुण महिला सेक्रेटरी स्नेहा दुबे (Sneha Dubey) सध्या प्रचंड चर्चेत आहेत, याचे कारण म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत (United Nations General Assembly (UNGA) स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावत पाकचा बुरखा टराटरा फाडला. पाकिस्तानचे (Pakistan)पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत (UNGA) आपल्या भाषणा दरम्यान काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर संबंधित देशाला प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या अधिकारांतर्गत स्नेहा दुबे यांनी इमरान खान यांना जोरदार उत्तर दिले आहे. "आग विझवणाऱ्याच्या वेषात पाकिस्तान हा आग लावणारा देश आहे," या शब्दात स्नेहा दुबे यांनी पाकला उत्तर दिले. एवढेच नाही तर पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे नंदनवन असून पाकने पोसलेल्या दहशतवाद्यांमुळे संपूर्ण जगाला दहशवादाचे चटके बसत असल्याची टीका त्यांनी केली आहे. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहिल, असे देखील त्यांनी पाकला ठणकावले.

कोण आहेत स्नेहा दुबे?

स्नेहा दुबे ह्या २०१२च्या IFS बॅचच्या अधिकारी आहेत. त्या पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास झाल्या आहेत. वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांना IFS ऑफिसर होण्याची इच्छा होती. जागतिक पातळीवरील घडामोडी आणि जग फिरण्याची त्यांना लहानपणापासून आवड होती. त्यांनी पदव्युत्तर पदवी भूगोलात मिळवली असून त्याच विषयात त्यांनी M.Phil केले आहे. त्यांनी ही पदवी जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून मिळवली आहे. तर शालेय शिक्षण गोव्यात आणि पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले आहे. त्यांचे वडील एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला आहेत आणि आई शिक्षिका आहे. माद्रिदमधील भारतीय दुतावासाच्या तृतीय सचिव म्हणून त्यांनी याआधी काम केले आहे. तर परराष्ट्र मंत्रालयातही त्यांनी काम केले आहे.

Tags:    

Similar News