कोरोना चाचणीसाठी नवीन नियमावली, डॉक्टर संघटनेचे आक्षेप

Update: 2020-05-19 15:29 GMT

कोरोना बाधीत रुग्णांच्या तसापणीसाठी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने सोमवारी नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये तपासणीच्या नियमांमध्ये काय काय बदल करण्यात आले आहेत ते पाहूया..

कुणाकुणाची होणार कोरोना चाचणी?

  1. गेल्या 14 दिवसात परदेशातून आलेले आणि कोरोनाची लक्षणं दिसत असलेले रुग्ण
  2. ज्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटव्ह आलेले आहेत, त्यांच्या संपर्कातील सगळ्यांची तपासणी होणार
  3. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे आणि प्रतिबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी
  4. श्वसनाचा तीव्र त्रास होत असलेले सर्व रुग्ण
  5. कोरोनाबाधीत रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या पण कोरोनाची लक्षणं नसलेल्या व्यक्तींची रुग्णाच्या संपर्कात आल्यापासून पाचव्या आणि दहाव्या दिवशी तपासणी होणार
  6. कंटेनमेंट आणि हॉटस्पॉटमध्ये ताप, सर्दी, खोकला यासारखा त्रास असलेल्या रुग्णांची तपासणी होणार
  7. स्थलांतरीत किंवा बाहेरुन आलेल्या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप यासारखे त्रास असतील तर आजारी पडल्यापासून 7 दिवसांच्या आत तपासणी
  8. प्रसुतीसह महत्त्वाचे वैद्यकीय उपचार कोरोनाच्या चाचणीसाठी थांबवू नये

दरम्यान असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सलटंटने या नियमावलीला आक्षेप घेतला आहे.

काय आहेत आक्षेप?

नवीन नियमावलीमध्ये ताप केंद्रांवरील तपासणी बंद करण्यात आली आहे. तसंच रुग्ण कंटेनमेंट किंवा हॉटस्पॉट झोनमधील असेल तरच OPDमध्ये त्याचे स्क्रिनिंग केले जाणार आहे. गर्भवती महिला, डायलिसिसवरील रुग्ण आणि गंभीर स्वरुपाच्या सर्जरी गरज असलेल्या रुग्णांची कोरोना तपासणी करण्याचा नियम रद्द करण्यात आला आहे. याला डॉक्टरांच्या संघटनेने विरोध केला आहे.

कंटेनमेंट किंवा हॉटस्पॉट झोनशिवाय इतर ठिकाणाहून पॉझिटिव्ह रुग्ण येत आहेत हे वास्तव सरकारला माहिती नसावे.

कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्णही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने शस्त्रक्रिया किंवा प्रसुतीच्यावेळी डॉक्टरांना आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग झाल्याचे प्रकार घडले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावरील शस्त्रक्रिये दरम्यान दिला जाणारा अनेस्थेशिया हा धोकादायक असतो आणि शस्त्रक्रियेनंतर त्या रुग्णांच्या प्रकृतीमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

सरकारतर्फे दरवेळी नियमावलीमध्ये बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे सरकारने याबाबत योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे अध्यक्ष डॉ. प्रदीप बैद यांनी केले आहे.

Similar News