डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला न्यायाधीशांचा विरोध, कारवाईच्या मागणीसाठी दलित संघटना रस्त्यावर
कर्नाटकमध्ये एकीकडे हिजाबचा वाद पेटलेला असताना प्रजासत्ताक दिनी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. महात्मा गांधी यांच्या फोटोजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेवण्यास जिल्हा न्यायाधीशांनी विरोध केला, त्यामुळे तो फोटो तेथून हटवला गेला आणि मग त्यानंतर ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर १९ फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये या न्यायाधीशांवर कारवाईच्या मागणीसाठी मोठा मोर्चा निघाला होता. या मोर्चामध्ये जवळपास लाखाच्यावर लोक सहभागी झाल्याचे सांगण्यात येते आहे.
प्रकरण नेमके काय?
26 जानेवारी रोजी कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यामध्ये न्यायाधीशांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावला जाणार होता. पण न्यायाधीश मल्लीकार्जुन गोंड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा काढल्याशिवाय आपण राष्ट्रध्वज फडकावणार नाही, अशी भूमिका घेतली, त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महात्मा गांधींच्या फोटोच्या बाजूला असलेला फोटो काढण्यात आला. त्यानंतर ही बातमी संपूर्ण रायचुर जिल्ह्यात पसरली आणि 26 जानेवारी नंतर सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर छोटी-मोठी आंदोलन सुरू झाली. पण सरकारने या आंदोलनांची दखल घेतली नाही असा आरोप करत राज्यात आंबेडकरी संघटनांनी मोठे आंदोलन केले. या आंदोलनात कर्नाटकसह रायचूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आंबेडकरवादी तसेच ओबीसी आणि इतर सर्व लोक या सहभागी झाले. या आंदोलनात १ लाखांपेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते, असा दावा कऱण्यात येतो आहे.
मुख्यमंत्र्यांचे म्हणणे काय?
या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आंदोलकांची भेट घेतली, आणि याप्रकरणी कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. हा न्यायालयीन कारवाईचा विषय असल्याने आपण मुख्य न्यायमूर्तींची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच कारवाईचा निर्णय मुख्य न्यायमूर्ती घेतील, असेही त्यांनी सांगितले. यानंतर न्यायाधीश मल्लिकार्जुन गोंड यांची बदली करण्यात आली आहे. पण त्यांची बदली न करता त्यांना निलंबित करण्यात यावं, अशी मोर्चेकऱ्यांची मागणी आहे. भविष्यात असे वर्तन करण्याचे साहस कोणत्याही विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने करायला नको अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच कडक कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
न्यायाधीशांचे म्हणणे काय?
या प्रकरणी वादात अडकलेले जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौंड यांनी आपली बाजू मांडताना कबुली दिली आहे. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनादर करण्याचा आपला हेतू नव्हता, असे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तिथून बाजूला हटवण्यात आला नाही, आपल्याविरुद्ध खोटी माहिती पसरवली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. "काही वकिलांनी माझी भेट घेतली होती, तसेच राज्य सरकारच्या परिपत्रकाप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो महात्मा गांधी यांच्या फोटोजवळ ठेवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. पण हायकोर्टाच्या रजिस्ट्रार यांनी आपल्याला सरकारच्या या आदेशाची मुद्दा हायकोर्टांच्या मोठ्या खंडपीठापुढे विचारार्थ प्रलंबित आहे आणि त्यावरचा निर्णय येईपर्यंत आपण माझ्यावर दबाव टाकू नये असे मी त्यांना सांगितले होते," असे न्यायाधीश मल्लिकार्जुन यांनी स्पष्ट केले आहे.
यानंतर ४ फेब्रुवारी रोजी कर्नाटक हायकोर्टाने हायकोर्ट, जिल्हा कोर्ट आणि तालुका स्तरावरील कोर्टांमधील शासकीय कार्यक्रमांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठेवण्यात यावा असा निर्णय दिला आहे.