हुडको कॉलनीला समस्यांनी ग्रासले ; नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

भुसावळ शहरातील 27 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हुडको कॉलनीत मुलभुत सुविधा मिळत नसल्याने नागरिक संतप्त.

Update: 2021-08-01 08:25 GMT

भुसावळ शहरातील हुडको कॉलनीची स्थापना म्हाडाच्या अंतर्गत 27 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. तेंव्हापासून आत्तापर्यंत या कॉलनीला अनेक समस्यांचा विळख्यात पडलेला आहे. वारंवार संबधित प्रशासनाला तक्रार करून देखील समस्या जैसे थेच असल्याने हैराण झालेल्या नागरिकांनी येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

हुडको कॉलनीमध्ये सर्व सुशिक्षित लोक राहतात, याठिकाणी काही मोकळे प्लॉट असल्यामुळे इतर भागातील कचरा या मोकळ्या प्लॉटमध्ये आणून टाकला जातो. त्यामुळे या कॉलनीत सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. कॉलनीतील विद्युत खांब असूनही त्यावर लाईट लावलेले नाहीत, त्यामुळे परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते, सोबतच कॉलनी परिसरामध्ये एकही असा चांगला रस्ता नसल्यामुळे नागरिकांना चिखलातून वाट काढवी लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

कॉलनीत पिण्याच्या पाण्याची तर मोठी समस्या आहे. येथे पंधरा दिवसातून एकदाच पाणी येत आहे, त्यात मिळणारे पाणी अस्वच्छ येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

नागरिकांना मुलभुत सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी भुसावळ नगरपालिकेत वारंवार तक्रारी केल्या मात्र, भुसावळ नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हुडको कॉलनी परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन कॉलनीतील समस्यांचा पाढा वाचला.

जोपर्यंत आमच्या सर्व समस्या सुटणार नाहीत, तोपर्यंत आगामी निवडणुकांमध्ये आम्ही मतदान करणार नाही, आमचा मतदानावर बहिष्कार असेल असे यावेळी स्थानिक रहिवाशांनी सांगितले आहे. राजकिय नेते, पुढारी केवळ निवडणुकीवेळी आश्वासनाचा पाऊस पाडतात. मात्र, प्रत्येक्षात काही नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत. प्रशासन देखील आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे मतदानावर तर बहिष्कार टाकूच पण प्रशासनाविरोधात देखील तीव्र आंदोलन करू असा इशारा हुडको कॉलनीतील नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे आता प्रशासन यावर काय निर्णय घेत आणि हुडको कॉलनीतील नागरिकांना मुलभुत समस्या सुटताता का? हे पाहणं येत्या काळात महत्वाचं ठरणार आहे.

Tags:    

Similar News